राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ‘मी तुम्हाला पुन्हा उभं करेन,’ असं सांगत बळ दिलं.
परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांना भेटी दिल्या. तसेच नासाडी झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही सगळेजण फिरतो आहोत. सध्या इतकं विचित्र झालेलं आहे की, करोनाचं संकट आहे. पुन्हा झाला आहे. एकामागोमाग एक संकट येतायेत. मी इथे हे सगळं बघुन सोडून द्यायला आलेलो नाही. इथे सगळेच आहेत. माहिती संपूर्ण घेतोय. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. खचून जाऊ नका. संकट येऊ द्या. तुमच्या सोबतीनं, तुमच्या साथीनं संकटांचा सामना करणार. काही ठिकाणी गावच्या गाव पाण्यात गेली आहेत. जे करायची गरज आहे, ते शक्तीपणानं लावू करू. मी तुम्हाला पुन्हा उभं करेन. पुन्हा व्यवस्थित उभं करतो. खचू नका, काळजी घ्या,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा दिला.
आणखी वाचा- “आकडे लावण्यासाठी आलेलो नाही,” उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना मदतीचं वचन
“जे करू तुमच्या सुखासाठी”
“शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका,” असं उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं होतं.