विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या सूत्रावरून शिवसेना- भाजपात सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे युतीबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येणार असल्याचे सांगत एकतर्फी युतीवर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या दाव्याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने युतीचे काय होणार याचीच कुजबुज उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकणाच्या मेट्रो भवन तसेच तीन नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पार पडले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून युतीच्या जागावाटप चर्चेच्या गुऱ्हाळात अडकले आहे. विधानसभेच्या निम्म्या जागांवर शिवसेना अडून बसली असून भाजप मात्र तेवढय़ा जागा शिवसेनेस देण्यास तयार नाही. त्यातच लोकसभेतील यशामुळे आत्मविशास वाढल्याने भाजप पुन्हा एकदा स्वबळाची तयारी करत असल्याच्या चर्चेनेही युतीत बेबनाव सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मात्र मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करीत राज्यात युतीचेच सरकार येणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच ठाकरे यांनी युतीवर शिक्कामोर्तब केले.  राज्यात अनेक चांगल्या गोष्टी आम्ही करीत असून त्याला आपला पाठिंबा मिळत असून तो असाच मिळत राहावा अशी विनंती पंतप्रधानांना करीत, आम्हाला सत्तेची हाव नाही. मात्र राज्याचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांचे कौतुक

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याबद्दल उद्धव यांनी मोदींचे आभार मानले. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि समान नागरी कायदाही तुम्ही कराल असा आम्हाला विश्वास आहे. मोदींच्या रूपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळाले आहे. मोदींनी चंद्रालाही गवसणी घातली आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी मोदींचे कौतुक केले.