राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट सरकारमध्ये सामील झाला आहे. मात्र, अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट पडलेली नाही या सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला शरद पवारांनी समर्थन दिलं आहे. तसेच, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तो त्यांचा लोकशाही अधिकार आहे असंही पवार म्हणाले. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं असून त्यांच्या या वक्तव्याचा कायदेशीर लढाईसंदर्भात नेमका अर्थ काय? यावर कायद्याचे अभ्यासक व ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना अजित पवारांबाबत मोठं विधान केलं. “अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेतच. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण लोकशाही प्रक्रियेत तो त्यांचा अधिकार आहे”, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या या विधानानंतर आता अजित पवार पुन्हा एकदा २०१९ प्रमाणे माघारी फिरणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच, शरद पवार अजित पवारांना समर्थन देऊन सरकारमध्ये सामील होणार का? अशीही चर्चा होऊ लागली आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? यावर उज्ज्वल निकम यांनी टीव्ही ९ शी बोलताना भाष्य केलं आहे.

शरद पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

“एक गोष्ट स्पष्ट होतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आहे याबाबत दोन्ही गटांमध्ये दुमत नाही. शरद पवारांचं म्हणणं आहे त्यांच्या पक्षात फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की वेगळी भूमिका घेतली म्हणून ते राजकीय पक्षापासून दूर गेलेले नाहीत असं अप्रत्यक्षपणे त्यांना सुचवायचं असावं. याचा आणखी एक अर्थ असाही होतो की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना वेगळी भूमिका घेतेलेल्या नेत्यांविरोधात दहाव्या परिशिष्टानुसार कोणतीही कारवाई करायची इच्छा दिसत नाही”, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

अजित पवार पुन्हा माघारी येणार? शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चेला उधाण! २०१९ ची पुनरावृत्ती होणार का?

“सुप्रिया सुळेंनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना कळवल्याचं केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षांना कळवलं म्हणजे काय? अध्यक्षांना त्यांनी असं कळवलंय का की राष्ट्रीय अध्यक्षांची त्यांनी अवज्ञा केलीये, प्रतोदांची आज्ञा ऐकलेली नाही म्हणून त्यांना अपात्र करावं? याबाबत स्पष्टता दिसत नाही. पण शरद पवारांना यासंदर्भात कोणतीही कायदेशीर लढाई करायची दिसत नाही असं दिसतंय. फक्त वेगळी भूमिका घेतल्यामुळे वेगवेगळ्या गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतील”, असं उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नव्हे, काहींचा वेगळा निर्णय; सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांना कायद्याच्या लढ्यात अडकायचं नाही”

“शरद पवारांना कायद्याच्या लढाईत अडकायचं नाहीये. शरद पवार म्हणतात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवारांची ही उत्कृष्ट राजकीय खेळी असू शकते”, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. “अजित पवारांनी स्पष्ट केलंय की शरद पवार आमचे नेतृत्व आहेत. त्यामुळे शरद पवारांना कुणी दुखवायला तयार नाहीत. शरद पवारही कायदेशीर कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे एका कुटुंबातले मतभेद मिटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो”, असंही ते म्हणाले.