देशात पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत यावे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पुनश्च केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भरघोस मतांनी निवडून यावेत म्हणून त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्रसिध्द हैद्रा येथील सुफी संत हजरत ख्वाजा सैफुल मुल्क दर्गाहवर जाऊन साकडे घातले.
हजरत ख्वाजा सैफुल मुल्क दर्गाह महाराष्ट्र-कर्नाटकात प्रसिध्द आहे. या दर्गाहमध्ये उर्स महोत्सव सुरू असतानाच त्याचे औचित्य साधून उज्ज्वला शिंदे यांनी आपल्या पतीसाठी दर्गाहमध्ये फुलांची चादर घेऊन गेल्या व बाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होत साकडे घातले. देशात काँग्रेसच्या अधिपत्याखालील संपुआची सत्ता कायम राहू दे आणि पती सुशीलकुमार शिंदे यांना भरघोस मतांनी विजय मिळावा, अशी प्रार्थना त्यांनी केली. या वेळी त्यांच्या समवेत सोलापूरच्या महापौर अलका राठोड व दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंड-पाटील, अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते अशपाक बळोरगी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य महिबूब मुल्ला आदी उपस्थित होते.