एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता मीरा भाईंदर महापालिकेचे शिवसेनेचे जवळपास १८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात या नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही प्रखर हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललो आहोत. या मताशी सहमत होऊन नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करु, असे सरनाईक या प्रसंगी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> Petrol Diesel Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

नगरेसवकांच्या या निर्णयावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मीरा भाईंदर मतदारसंघात मी तीन टर्मपासून आमदार आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. हे सर्व दोन ते तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी साडे तीनशे ते चारशे कोटी रुपये दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादा मुख्यमंत्री निधी देत असेल आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा असं घडत असेल, तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचा सन्मान आणि सत्कार आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या हस्ते व्हायला हवा, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

तसेच, आम्ही प्रखर हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललो आहोत. या मताशी सहमत होऊन नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करु, असेही सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंना मानता, तर मग त्यांना सोडून का आलात?” निलेश राणेंचा दीपक केसरकरांना सवाल, ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत लगावला टोला!

दरम्यान, याआधी ठाणे महापालिकेतही उद्धव ठाकरे यांना चांगलाच धक्का बसला. येथील शिवसेनेचे ६७ पैकी तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. तर नवी मुंबईच्याही काही नगरसेवकांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. नगरसेवकांसोबतच राज्यभातील काही काही खासदार आणि शिवसैनिक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमधील नरसेवकांची बंडखोरी शिवसेनेसाठी चांगलीच धक्कादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे.