सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा रौप्य महोत्सवी २५ वा भव्य व्यापारी एकता मेळावा येत्या ३१ जानेवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासोबतच उद्योग प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम १ व २ फेब्रुवारी रोजी होतील, असे आयोजकांनी सांगितले. या मेळाव्यास गृहमंत्री आर. आर. पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे, गोवा राज्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, आम. दीपक केसरकर, आम. प्रमोद जठार, आम. किरण पावसकर व नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब तांबोसकर असतील, असे सांगण्यात आले.
या मेळाव्यात एफ.डी.आय. व व्यापारविषयक दक्षताबाबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रामभाऊ भोगले, अर्थकारण व नवीन व्यापारविषयक दिशाबाबत मॅक्सवेल इंडस्ट्रीज चेअरमन जयकुमार पाठारे, व्यवसाय व परिवार यांच्या समन्वयाबाबत द्वारका ग्रुपचे द्वारका जल व पर्यटन व अत्याधुनिक ग्राहक सेवाबाबत पद्माकर देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील व्यापाऱ्यांनी २५ वर्षांपूर्वी एकत्रित येऊन व्यापारी मंडळींच्या हिताचे रक्षण केले. जिल्ह्य़ात त्यापूर्वी व्यापारी एकजूट होती. त्या काळी शासनाच्या त्रासाला व्यापाऱ्यांनी तोंड दिल्याचे बोलताना नितीन वाळके यांनी सांगितले.
या मेळाव्यात व्यापाऱ्यांचे प्रश्न, विचारमंथन, प्रबोधन होणार आहे. शिवाय स्मरणिकेतून जिल्ह्य़ातील व्यापार वृद्धीची माहिती दिली जाणार आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याची जाणीव व्यापाऱ्यांना करून दिली जाणार आहे, असे नितीन वाळके म्हणाले.
यावेळी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, अनंत पोकळे, चंद्रकांत शिरोडकर, बाळ बोर्डेकर, आनंद नेवगी, जगदीश मांजरेकर, प्रसाद घडाम, अरविंद नेवाळकर, नगरसेविका कीर्ती बोंद्रे, आरती पेडणेकर, दिलीप भालेकर, अभय पंडित, किरण सिद्धये, चित्तरंजन रेडकर, महेश कोरगावकर, पुंडलिक दळवी, हेमंत मुंज, माया चिटणीस, भूपेंद्र सावंत व अन्य उपस्थित होते. सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.