केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भुसावळ तालुक्यातील ओझारखेडा येथील प्रज्ञाचक्षु (अंध) प्रांजली पाटील यांनी ७७३ व्या क्रमांकाने यश मिळविले आहे. प्रांजली येथील ‘दीपस्तंभ मनोबल’ या प्रज्ञाचक्षु व विशेष (अपंग) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या देशातील पहिल्या निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आहेत.
प्रांजली यांचे माहेर बोदवड तालुक्यातील वडजी येथील असून सध्या त्या उल्हासनगर येथे राहतात. प्रांजलीच्या यशामुळे दीपस्तंभ मनोबल केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोश केला. प्रांजली यांना लहानपणी कमी दिसत होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी नजर कमी असल्याचे सांगून वयाच्या बाराव्या वर्षांनंतर अंधत्व येण्याची शक्यता व्यक्त केली होती. तेव्हाच प्रांजलीला स्वतच्या पायावर उभे करण्याचा निर्धार आई-वडिलांनी केला. त्यांनी प्रांजलीला इंग्रजी माध्यम शाळेत दाखल केले. दुसरीत असताना एका विद्यार्थ्यांने डोळ्यांवर पेन्सिल मारल्याने एक डोळा अधू झाला. तिसरीत असताना चाळीसगाव येथे एका लग्नात कुटुंबीयांसमवेत आली असता प्रांजली आजारी पडली. या आजारातच दुसरा डोळाही अधू झाला. प्रांजलीच्या जीवनात अंधत्व आल्याने तिच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले; परंतु त्यांनी हार न मानता प्रांजलीला धीर देत पुढे शिकविले. प्रांजलीचे चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादर येथील मेहता अंध शाळेत झाले. दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर चांदीबाई महाविद्यालयात १२ वीमध्ये ८५ टक्के गुण मिळवून कला शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर झेव्हियर महाविद्यालयातून कला शाखेत पदवी मिळविताना विद्यापीठात प्रथम येण्याची कामगिरी केली. आत्मबल वाढलेल्या प्रांजलीने वडिलांकडे आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात एम. फिल. केले. ओझारखेडा येथील केबल व्यावसायिक कोमलसिंग पाटील यांनी प्रांजलीला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले असतानाही त्यांच्याशी विवाह करत खंबीर साथ दिली. आपल्या यशात आई, वडील, पती, मित्र, नातेवाईक व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने राहण्यासह उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांमुळे अंधत्वावर मात करून हे यश प्राप्त करता आल्याची प्रतिक्रिया प्रांजली यांनी व्यक्त केली आहे.
दीपस्तंभ मनोबल केंद्राचे संचालक प्रा. यजुर्वेद्र महाजन यांनी अंधत्वावर मात करून प्रांजलीने दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास व परिश्रमाने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. जामनेर तालुक्यातील मूळचे शेंदुर्णी येथील राहुल गरुड यांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८७९ वा क्रमांक मिळवला आहे. सध्या गरुड हे असिस्टंट कमांडंट म्हणून जबलपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam pranjali patil
First published on: 12-05-2016 at 01:32 IST