scorecardresearch

उर्फी जावेद रुपाली चाकणकरांची भेट घेणार; चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

उर्फी जावेद रुपाली चाकणकरांची भेट घेणार; चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता
रुपाली चाकणकर चित्रा वाघ ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अभिनेत्री उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांतही उर्फीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, उर्फी जावेदवर महिला आयोग का कारवाई करत नाही? असा सवाल करत रुपाली चाकणकरांना चित्रा वाघ यांनी लक्ष्य केलं. त्यामुळे उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. अशातच आज ( १३ नोव्हेंबर ) उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याचप्रकरणी उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : “नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”, अमृता फडणवीसांचं मोठं विधान

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

“उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.

हेही वाचा : चित्रा वाघ यांच्याशी वादानंतर दोन दिवस शांत असलेल्या उर्फीची नवी पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली…

चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस

उर्फी जावेदच्या कपड्यावरून सुरु झालेल्या वादावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला खडेबोल सुनावले होते. तसेच, चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसांत खुलासा करावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : रामदास कदमांचा ठाकरे गटावर हल्लाबोल, भलत्याच प्राण्याशी तुलना करत अनिल परबांवर टीका!

“अशा ५६ नोटीशीत…”

महिला आयोगाच्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांनी म्हटलं की, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय, याचं आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीस पाठवण्याचा, तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर पडलीय. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरत आहे, तिला नोटीस द्यायला हवी… तर तिला नोटीस न देता… हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला नोटीस पाठवली आहे. असो… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार…”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 10:20 IST

संबंधित बातम्या