रुग्णसेवेसाठी महाविद्यालयाच्या आवाराचा वापर

वसई : वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील करोना केंद्रासमोर झाड पडल्याने केंद्रात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता करोना केंद्रात जाण्यासाठी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वापर करण्यात येत असल्याने महाविद्यालयाचे कर्मचारी भयभीत झाले आहेत.

वसई पश्चिमेच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी म्हणून महाविद्यालयाची एक इमारत प्रशासनाला करोना केंद्रासाठी दिली आहे. या इमारतीत दीडशे खाटांचे करोना उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे. ही इमारत मागील बाजूस असून तिथे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत इतर कामे होत होती. परंतु वादळामुळे करोना केंद्रासमोरच्या भागात मोठे झाड पडले आहे. तीन दिवस झाले तरी हे झाड महापालिका अथवा अग्निशमन विभागाने हटवले नाही. त्यामुळे करोना केंद्रात जाण्यासाठी मुख्य इमारतीमधून ये-जा केली जात आहे. करोनाबाधित रुग्ण, करोना केंद्राचे कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच शववाहिन्या याच मुख्य आवारातून जात आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती वाटू लागली आहे.

मागील एक वर्षांपासून आम्ही आमच्या महाविद्यालयाची इमारत पालिकेला करोना केंद्रासाठी दिली होती. दुसऱ्या लाटेच्या वेळीदेखील महसूल प्रशासनाला दिली आहे. मात्र आता आमच्या मुख्य आवाराचा वापर केला जात असल्याने कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती वाटत आहे. करोना केंद्रासमोरील झाड हटवून पूर्वीच्या रस्त्याचा वापर करावा, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी सांगितले.