पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील करोनावरील लसीकरणाचा आढावा घेतला. विशेषतः ज्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी आहे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद मोदी यांनी साधला. महाराष्ट्राचाही यामध्ये समावेश होता. घरोघरी जात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सुचना केल्या, स्थानिक धर्मगुरुंची मदत घेण्याचा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात पहिला डोस १०० टक्के नागरीकांना दिला जावा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. थोडक्यात लसीकरणाचा वेग वाढवा अशा सुचना राज्य आणि केंद्र पातळीवरुन दिल्या जात आहेत.

असं असताना पुढील ३-४ दिवस मात्र राज्यात करोनावरील लसीकरण हे बंद रहाणार आहे. अर्थात राज्य सरकारतर्फे अधिकृत जाहीर केलं नसलं तरी अनेक महानगरपालिकांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिवाळीनिमित्त लसीकरण बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढील ३-४ दिवस राज्यातील लसीकरणाचा वेग हा कमी असणार आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे महानगरपालिकांनी लसीकरण केंद्र बंद रहाणार असल्याची घोषणाही केली आहे.

तरीही राज्याकडे पुरेसा लशींचा साठा आहे, लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात लसीकरणाचा वेग पुन्हा वाढेल असं चित्र आहे. राज्यात गेले काही दिवस करोना बाधित दैनंदिन रुग्ण संख्या ही एक हजाराच्या आसपास नोंदवली जात आहे. थोडक्यात राज्यात करोनाचा संसर्ग हा मंदावला असून तो दीड वर्षातील निचतम पातळीवर आहे. आत्तापर्यंत राज्यात ९ कोटी ९० लाख लोकांचे लसीकरण झाले असून लशीचे दोन डोस मिळाल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.