मुंबईतील गोरेगाव येथे आजपासून वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वडापाव महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला संबोधून वडापावबाबतच्या त्यांच्या बालपणीच्या आठवणीही सांगितल्या. तसंच, आजच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी मिश्किल भाषण केलं.

राज ठाकरे म्हणाले, अशोक वैद्य यांनी वडापाव ही संकल्पना मांडली. ही अशी माणसं आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. हा वडापाव कुठे कुठे पोहोचला आहे. दहा वर्षांपूर्वी दोन मराठी मुलं माझ्याकडे आले आणि म्हणाले की, आज सकाळी बाळासाहेबांना भेटलो, तुम्हाला भेटायची इच्छा होती. तुम्ही आम्हाला भेटलात. आज आम्ही लंडनला जाणार. लंडनला गेल्यावर काय करणार असं विचारलं. तर ते म्हणाले की लंडनला जाऊन आम्ही वडापाव विकणार आहोत. मी तिथे नंतर एकेदिवशी जाऊन आलो. गोऱ्या लोकांची वडापाव खायला प्रचंड गर्दी होती. तिथं तिखट मानवत नाही. पण अशोक वैद्यांनी सुरुवात केलेला एक वडापाव लंडनमधली लोक खात आहेत.

“सचिन तेंडुलकरांचे गुरू आचरेकरसर त्याला शिकवत असताना स्टम्पवर एक रुपया ठेवायचे. आणि तो एक रुपया ठेवल्यानंतर सचिनला सांगायचे की हा जर इथंच राहिला तर संध्याकाळचा वडापाव तुझा. सचिन खेळत बसायचा, पण स्टम्पला बॉल लागू द्यायचा नाही त्या वडापावसाठी. मला एक उद्योगपतीही माहितेयत, ते बॉलरुम घेतात आणि फुटबॉलची फायनल तिथे घेतात. सगळे उद्योगपती तिथे असतात. मेन्यु काय असतो तर वडापाव आणि शॅम्पेन. हे गेले अनेक वर्षे चालत आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“मी आजपर्यंत वाईट वडापाव खालला नाही. माझं बालपण शिवाजी पार्कात गेल्याने किर्ती कॉलेजजवळचा वडापाव, शिवाजी पार्कमधील वडापाव, जिमखाना येथील वडापाव खालला आहे. येथील वडापाव खात खात पुढच्या पिढ्या उभ्या राहिल्या. अशोक वैद्यांनी किती पिढ्या घडवल्या आणि किती गाड्या उभ्या केल्या”, अशीही आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

हेही वाचा >> राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी, नेमकं कारण काय?

“आज या भाषणाचा विषय नाही. पण गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की मला आजच्या राज्य सरकारची आठवण होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहेत की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला वडा एकनाथ शिंदे आहेत, की वाईस वर्सा आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सकाळी भेट घेतली होती. मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन चर्चा केली.