महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील महान राष्ट्र आहे. या महाराष्ट्रानेच देशाला आचार, विचार, देशभक्ती आणि धर्माच्या रक्षणाचा मार्ग दाखविला आहे. आजही हिंदुस्थान महाराष्ट्राकडे फार आशेने पाहात आहे, असे मत साध्वी प्रज्ञासिंहचे नातेवाईक भगवान झा यांनी व्यक्त केले.
प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने येथील गणपती घाटावर शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांना वीर जिवा महाले पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या मेहुण्यांनी स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. दिगंबर िशदे यांना पंताजी काका बोकील पुरस्काराने गौरविण्यात आले, तर देवगडच्या स्वाती बापट यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्राला राष्ट्रसंतांची, बुद्धीजिवींची, विचारवंतांची, धर्मतारकांची खूप मोठी परंपरा आहे. या देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा खूपच मोठा वाटा आहे, असे सांगून भगवान झा म्हणाले आपल्या देशात जयललितांपासून अनेक भ्रष्टाचाऱ्यांना व गुन्हेगारांना जामीन मिळतो, परंतु अद्यापपर्यंत कोणताही पुरावा नसलेल्या साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मिळत नाही. सरकारच्या सर्व यंत्रणांना तिच्या विरुद्ध आरोप सिद्ध करता आलेला नाही पण तिला जामीन देण्यात यावा अशी कोणतीही यंत्रणा सांगत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे . यावेळी त्यांनी या विषयीची अनेक उदाहरणे दिली. यावेळी स्वाती बापट यांनी आपला लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नाही तर शिवाजी महाराजांबद्दल विकृत माहिती पुरविणाऱ्या व पसरविणाऱ्या विरुद्ध आहे. शिवाजी महाराज कोणत्याही एका समाजाचे, जातीचे नव्हते ते सर्व समाजाचे होते, पण त्यांना एका चौकटीत बंद करणाऱ्यांच्या विरुद्ध आपला लढा आहे. त्यासाठीची न्यायालयीन लढाई मी लढत आहे. न्यायालयाला माझे म्हणणे पटले असून त्यांनी खोटा व स्वतला पाहिजे असणारा इतिहास सांगणाऱ्यांना जामीनही नकारला आहे असे सांगितले.
यावेळी अॅड. दिगंबर शिदे व मोहन शेटे यांचे भाषण झाले. प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रतापगडावर कबरच्या परिसरात १९९४ पूर्वी उरुस होत असे. यावेळी शिवाजी महाराजांबद्दल अतिशय विकृत भाषा वापरली जात असे. याची खातरजमा केल्यावरच प्रतापगडावर वाईतल्या कार्यकर्त्यांकडून शिवप्रतापदिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत इथे शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खानाचा उदोउदो होत होता. इथे नेहरूंनी बसविलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यशिवाय कोणताही बदल झालेला नाही. पण कबर परिसरात फार मोठे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे पाडण्यास सांगूनही त्याला शासन संरक्षण देत आहे याला आमचा विरोध असल्याचे सांगितले. यावेळी डी. एम. बावळेकर, विनायक पावस्कर, पंडितराव मोडक, विनायक सणस, नितीन माने यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास नितीन बानुगडे पाटील येणार होते त्यामुळे कार्यक्रम लांबला होता. आयत्या वेळी ते न आल्याने कार्यक्रम लांबल्याबद्दल प्रतापगड उत्सव समितीने प्रशासन आणि शिवभक्तांकडे दिलगिरी व्यक्त केली. मंदार पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. रविवार पेठेतून वीर जीवा महालेची पालखी समारंभस्थळी वाजत गाजत आणण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राने देशभक्तीचा मार्ग दाखविला- झा
महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील महान राष्ट्र आहे. या महाराष्ट्रानेच देशाला आचार, विचार, देशभक्ती आणि धर्माच्या रक्षणाचा मार्ग दाखविला आहे. आजही हिंदुस्थान महाराष्ट्राकडे फार आशेने पाहात आहे, असे मत साध्वी प्रज्ञासिंहचे नातेवाईक भगवान झा यांनी व्यक्त केले.

First published on: 30-11-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veer jiva mahale award distributed in wai