पावसाळ्यास प्रारंभ होऊन दोन महिने उलटत आहेत, तरीही पावसाचे म्हणावे असे दमदार आगमन प्रतीक्षेतच असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. रविवारचा आठवडीबाजार आणि सोमवारी भाजीमंडईत सर्वच पालेभाज्यांचे दर वाढल्याचे दिसून आले. भाज्यांचे दर भरमसाठ वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
सलग तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. मागील पावसाळ्यातही जिल्ह्यात सर्वत्र तोकडय़ा स्वरूपाचा पाऊस झाला. परिणामी मोठे प्रकल्प, साठवण व पाझर तलाव, नदीनाले पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील जलस्रोतांच्या पाणीपातळीतही घट झाली. पाण्याची उपलब्धता नसल्याने उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड शेतकरी करू शकले नाहीत. ज्यांच्याकडे थोडेबहुत पाणी आहे, अशा काही शेतकऱ्यांनी आपापल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतात पालेभाज्यांची लागवड केली. परंतु मागणीच्या तुलनेत बाजारात कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत.
शहरातील बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर किलोला ४० ते ५० रुपये असल्याचे दिसून आले. भेंडी, गवार, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगे, काकडी, दोडका या भाज्यांचे दर प्रतिकिलो ५० ते ७० रुपयांपर्यंत होते. बटाटा ३० ते ४० रुपये, तर हिरवी मिरची ५० ते ६० रुपये किलोने विकली गेली. कोिथबिरीला अधिक भाव आहे. मेथीच्या एका पेंढीला १० ते २० रुपये भाव आहे. पाणीटंचाईमुळे बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली. जीवघेण्या महागाईमुळे गरीब व सामान्य कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे. पावसाचे आगमन वेळेवर होणे गरजेचे आहे. पावसाला वेळेवर सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन पालेभाज्यांचे दर महिनाभरात आवाक्यात येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2015 रोजी प्रकाशित
पावसाअभावी भाज्या महागल्या
पावसाळ्यास प्रारंभ होऊन दोन महिने उलटत आहेत, तरीही पावसाचे म्हणावे असे दमदार आगमन प्रतीक्षेतच असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.
First published on: 28-07-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable rate increase without rain