विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विदर्भात चार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, कापूस व सोयाबीनला भाववाढ न दिल्याबद्दल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी उद्या, रविवारी यवतमाळ जिल्ह्य़ातील पिंपळखुटी येथे होणाऱ्या कार्यक्रमात सरकारच्या नाकर्तेपणावर गप्प असलेल्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी व शेतकरी विधवा त्यांच्या गाडय़ांचा ताफा अडवून जाब विचारणार आहेत.
अधिवेशन काळात यवतमाळ जिल्ह्य़ातील मोहदा येथील प्रफुल्ल राजुरकर, भंडारा जिल्ह्य़ातील कुर्झा येथील मनोहर मस्के, चंद्रपूर जिल्ह्य़ातील चांदपूर येथील रमेझ झटकर व चिखळी येथील चंद्रप्रकाश कडसकर या चार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे दु:ख जाणून घेण्याचे सोडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या, १५ डिसेंबरला पिंपळखुटी येथे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टोल नाक्याच्या उद्घाटनसाठी जात आहेत.
पिंपळखुटी परिसरातील शंभरावर गावांना पैनगंगेच्या पुराचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप आणि कापूस, सोयाबीनच्या हमीभावाच्या प्रश्नावर तोडगा काढायचे सोडून उद्घाटनासाठी तेथे जात आहेत. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारचे उदासीन धोरण असून सतत जखमेवर मीठ चोळत असल्याने उद्याच्या समारंभात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला.  पिंपळखुटीला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये भेट देऊन नापिकीची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने शेतक ऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली होती. गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. हिवाळी अधिवेशनात तीन हजार कोटींच्या मदतीची घोषणा करून शेतक ऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
पिंपळखुटी, कोदोरी, चनाखा, रुढा, अर्ली, खैरी, वडवाट, घुबडी, कारेगाव, हिवरी, रामपूर, ठाणेगाव, वगारटाकळी, सावरगाव, मंगी यासह यवतमाळ जिल्ह्य़ातील शंभर गावातील शेतकऱ्यांना पुराचा फटका बसलेला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात अतिवृष्टी व नापिकीमुळे वर्षभरात जवळपास दोनशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या जिल्ह्य़ातील केळापूर व झरी तालुक्यातील आणेवारी ५० टक्क्यांवर काढण्यात आली आहे. नाकर्तेपणावर गप्प असलेल्या मुख्यमंत्र्यांना गाडय़ांचा ताफा अडवून जाब विचारला जाईल, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.