कोल्हापुरात पथकर विरोधी जनआंदोलन भडकल्यानंतर राज्य शासनाने पथकराची कोटय़वधीची रक्कम महानगरपालिका देईल, असे जाहीर करून यावर तोडगा काढला असला तरी विदर्भात प्रमुख राज्य महामार्गावरील पथकर नाके ग्रामपंचायत क्षेत्रात येतात आणि उत्पन्नाच्या बाबतीत ग्रामपंचायती अतिशय गरीब असल्याने मुख्यमंत्री विदर्भातील पथकरावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रच्या तुलनेत विकासात माघारलेल्या विदर्भात पथकर वसुली जोरात सुरू आहे. बुलढाण्यापासून तर गडचिरोली या विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना पथकर भरावा लागतो. चंद्रपूरच्या नागरिकाला नागपूरला जायचे असेल तर बस भाडय़ापेक्षा अधिक पथकरच भरावा लागतो. वरोरा-बामणी हा मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गाने चंद्रपूरला येणाऱ्या प्रत्येकाला तीन वेळा पथकर भरावा लागणार आहे. चंद्रपूर ते नागपूर या मार्गासाठी ताडाळी, वरोरा व जाम तीन जागी कर भरावा लागतो. तिकडे अमरावती व अकोलावासियांना नागपूरसाठी दोन ठिकाणी व यवतमाळ व वर्धा येथून नागपूरला येताना एका जागी पथकर भरावा लागतो. बुलढाणा, वाशिम व नक्षलवादग्रस्त गडचिरोली पथकर मुक्त नाही. विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ातील लोकांना पथकर भरावा लागतो. विशेष म्हणजे, विदर्भातील सर्वच पथकर नाके ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरच्या पथकरावर तोडगा काढतांना महानगरपालिका रक्कम भरेल, असे म्हटले आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न कोटय़वधीच्या घरात असते. कोल्हापूरवासियांनी महानगरपालिकेचा तोडगा नाकारला आहे, परंतु विदर्भातील पथकर नाके ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. त्यामुळे विदर्भातील पथकरावर तोडगा काढतांना राज्याचे मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न जेमतेम असते. तुटपुंज्या उत्पन्नावर ग्रामपंचायतींचा कारभार सुरू चालतो. त्यामुळे तोडगा काढण्याचीच वेळ आली तर मुख्यमंत्री काय सुचवितात, याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. वरोरा-बामणी या रस्त्याचा पथकर वसूल करण्यासाठी सर्व पथकर नाके ग्राम पंचायत क्षेत्रात लागणार आहेत. त्यासाठी संबंधित कंपनी एका ठराविक शुल्कात नियमित ये-जा करणाऱ्यांना महिना, सहा महिने व वष्रेभराचे पासेस उपलब्ध करून देणार आहे, परंतु रोड टॅक्स व इतर सर्व कर भरत असल्याने पथकरही द्यावा लागू नये, अशी भूमिका हळूहळू विदर्भवाद्यांच्या मनात जोर धरत आहे. पथकराच्या विरोधात विदर्भातही जनमत तयार होत आहे. त्यामुळे पथकराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.