बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यालयाचा परिसर व सभोवतालीचा परिसर स्वच्छ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सरावली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वापर केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि सरावली ग्रामपंचायतीला नोटीस पाठवली आहे.
बोईसर विधानसभा क्षेत्रात सरावली ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे निवडणूक प्रचार कार्यालय आहे. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना कार्यालयाचा परिसर, प्रवेशद्वार व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी सरावली ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व वाहनांचा वापर केला होता. शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक हे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याने हा परिसर टापटीप करण्यात आला होता. ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर पडलेला कचरा किंवा इमारत परिसरात असलेला कचरा यांची कधीही साफसफाई केली जात नाही. मात्र आपल्या नेत्याला परिसर स्वच्छ दिसावा या ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वापर केल्याने निवडणूक विभागाने सरावली ग्रामपंचायतीला आचारसंहितेचा भंग म्हणून नोटीस बजावली आहे.
कारवाई करण्याची मागणी
सरावली ग्रामपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता असून ग्रामपंचायतीचा वापर पक्षांच्या कामांसाठी अनेकदा केल्याचे दिसून आले आहे. कुठेही राजकीय कार्यक्रम असल्यावर ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांकडून कामे करून घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. मात्र आता उघड झाल्याने याविषयी जबाबदार असणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सरावली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून राजकीय पक्षांचे कार्यालय व परिसराची आचारसंहिता असताना साफसफाई करण्यात आली. सत्तेचा वापर ही साफसफाई केल्याचे दिसून आल्याने या ग्रामपंचायतीला नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– विकास गजरे, निवडणूक निर्णय अधिकारी, बोईसर विधानसभा मतदारसंघ