|| मिल्टन सौदिया
काँग्रेस रिंगणात नसल्याने मतदारांपुढे पेच:- वसई मतदारसंघातील बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे वसईतील निर्णायक असलेल्या ख्रिस्ती मतदारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. वसई विधानसभा मतदारसंघात यंदाही काँग्रेसने उमेदवारी न देता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. ठाकूरविरोधात महायुतीचे विजय पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. वसईतील ख्रिस्ती समाज आणि सामाजिक संघटना बविआ आणि जातीयावादाविरोधात असल्याने या निवडणुकीत त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४ हजार ६७४ अशी मतदारसंख्या आहे. हा मतदारसंघ पश्चिमेकडे अर्नाळा ते नायगाव आणि पूर्वेला जूचंद्र ते कामण-पोमण असा पसरला आहे. यात एक लाखाच्या आसपास कथॉलिक मते आहेत. यामध्ये नायगावपासून, वसई कोळीवाडा, अर्नाळा या ठिकाणी राहाणाऱ्या ख्रिस्ती कोळी मतांची संख्याही मोठी आहे. ही मते या मतदारसंघात निर्णायक ठरत असतात. येथील ख्रिस्ती मतदार काँग्रेसच्या बाजूने असतात. यंदाही काँग्रेसने बविआला पाठिंबा दिला आहे. ख्रिस्ती मतदारांना स्थानिक ठाकूरांना विरोध आणि जातीयवादी पक्षालाही विरोध असल्याने त्यांची मते कुणाला जातील आणि त्यांची भूमिका काय असेल याकडे पुढच्या राजकारणाची गणिते अवलंबून आहेत.
यासंदर्भात हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे म्हणाले की, भाजपाने संपूर्ण देशाची वाट लावली आहे आणि शिवसेना मुंबईचे लचके तोडत आहे. या दोघांना मतदान करणे म्हणजे स्वत:च्या हातांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. डाबरे पुढे असेही म्हणाले, ‘वसईत दहशतीचा एक काळ होता. आता ती परिस्थिती नाही. वसईत कोणाचीही दहशत नाही. आता नालासोपाऱ्यायात प्रदीप शर्माची दहशत तयार होत आहे,’ असे ते म्हणाले.
रोनाल्डो सामाजिक संस्था, जागृती मित्र परिवार आदी संघटनांनीही वसईतील पुराच्या समस्या न सुटल्याने बविआऐवजी शिवसेनेला मतदान करणार असल्याचे सांगितले. वर्षांनुवर्षे चुळणकर पावसाच्या पाण्यात बुडत आहेत. ही समस्या न सुटल्याने आम्ही यंदा बहुजन विकास आघाडीला मतदान करणार नाहीत, असेही गोम्स म्हणाले. वसईत समस्या आहेत. पक्ष जातीयवादी असला तरी आम्ही व्यक्ती म्हणून विजय पाटील यांना आमची संघटना पाठिंबा देणार आहे, असे रोनाल्डो सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्टीफन डिमेलो यांनी सांगितले.
आम्ही हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत जाणार नाहीच पण जातीयवाद्यांनाही आम्ही पाठिंबा देणार नाही. पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून विजय पाटील यांना आम्ही या वेळी पाठिंबा देत आहोत. – मनवेल तुस्कानो, निर्भय जनमंच संघटना
.शिवसेना-भाजप सोडून अन्य कोणालाही मतदान करा. लोकशाही बुडवणाऱ्या शिवसेना पक्षाशी हातमिळवणी कशी करणार? गेल्या पाच वर्षांत भाजपाने देशातली अर्धी लोकशाही पोखरली आहे. आता संविधान पण संपेल. स्थानिक फायद्यासाठी देश गहाण टाकू नका. – फादर मायकल जी., सामाजिक कार्यकर्ते