|| नीरज राऊत
गणपती, नवरात्र व दसरा या सणांना यंदा मंदीचा फटका बसल्याने या सणांदरम्यान बाजारपेठेमधील खरेदीवर परिणाम झाला होता. त्याच पद्धतीचा मंदीचा फटका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिसून येत असून निवडणुकीसाठी आवश्यक वातावरण तयार करण्यात आर्थिक चणचण सर्वच राजकीय पक्षांना भासत आहे. अवघ्या तीन दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असताना अनेक भागांमध्ये आवश्यक वातावरणनिर्मिती झाली नसल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकीमध्ये आपापल्या उमेदवारांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्ष वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. मात्र या सर्वाकरिता लागणाऱ्या निधीची चणचण अनेक पक्षांना भासू लागली आहे. उद्योग, व्यापारी वर्ग तसेच पक्षाशी निष्ठा बाळगणारे दानशूर व्यक्ती आपापल्या परीने निवडणुकीच्या काळात आपला आर्थिक सहभाग देत असतात. यंदाच्या वर्षी औद्योगिक क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात मंदीची झळ बसली असून उद्योगांकडून येणारा देणगी स्वरूपातील निधी खूप कमी प्रमाणात आल्याचे शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. २०१८च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक निधी संकलन करण्यासाठी गेलेल्या काही शिवसैनिकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते उद्योगांकडे निवडणूक निधी मागण्यास धास्तावत आहे.
निवडणुकीत तयार करण्यात येणारे बॅनर, फ्लेक्स बोर्डचे प्रमाण तुलनात्मक कमी झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांऐवजी पाण्याचे पाऊच वितरित करण्याचा फंडा वापरला जात असून कार्यकर्त्यांना बिर्याणी किंवा जेवणाची थाळी देण्याऐवजी घरगुती पद्धतीने तयार केलेले जेवण स्वस्त पडत असल्याने दिले जात आहे. भाडय़ाने गाडय़ा घेण्याऐवजी मित्र परिवाराकडून गाडय़ा सहकार्याच्या भावनेने देण्यात आल्याचे दाखवण्यात येत आहे.
निवडणूक कामी लागणाऱ्या निर्णय साहित्याचे दर पत्रक
खाद्य पदार्थ
- जेवणाची थाळी : ७० रुपये
- जेवणाची थाळी (विशेष) : १०० रुपये
- व्हेजिटेबल पुलाव/ बिर्याणी : ५० रुपये
- मटण मसाला :१०० रुपये
- मच्छी करी : ८० रुपये
- अंडा करी : ५० रुपये
- मटण बिर्याणी : १२० रुपये
- चिकन बिर्याणी : ८० रुपये
इतर वस्तू :
- गांधी टोपी : ३.५० रुपये
- गोल टोपी : ३.५० रुपये
- गमजा/ मफलर : ३.५० रुपये
- मुखवटे : ४० रुपये
- शिट्टी : ७० पैसे
- हातवाली खुर्ची : ७ रुपये
- बिनहातवाली खुर्ची : ५ रुपये
- सोफा : १५० रुपये
- टेबल : ३५ रुपये
- कुशन खुर्ची : ३० रुपये
- डिजिटल बॅनर : ९ रुपये प्रति चौरस फूट
- तीन आसनी रिक्षा : १,२५० रुपये प्रतिदिन
- सहा आसनी रिक्षा : १५०० रुपये प्रतिदिन
- दुचाकी वाहने : ३००-३५० रुपये प्रतिदिन
- वाहनचालक : प्रतिदिन ७०० रुपये