|| नीरज राऊत
भाजप नेत्याच्या बंडखोरीचे शिवसेनेपुढे आव्हान; बविआला नाराजीचा फटका बसण्याची शक्यता:- बोईसर विधानसभेच्या जागेवर तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी बहुजन विकास आघाडी सज्ज झाली असली तरी त्यांच्यापुढे बविआतून शिवसेनेत गेलेले आमदार विलास तरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांचे आव्हान आहे. तीनही उमेदवारांचे आपापले प्रभावक्षेत्र असून शिवसेना आणि बविआमधील नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.
२००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीने आमदार विलास तरे यांच्या रूपाने विजय मिळवला होता. मात्र २०१८ आणि २०१९मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडी या मतदारसंघात पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. विलास तरे यांच्यावर एकीकडे निष्क्रियतेचा आरोप बहुजन विकास आघाडीतर्फे तसेच नागरिकांकडून करण्यात येत असताना त्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे शिवसेनेतील काही मंडळी दुखावली गेली आहे. असे असले तरी मृदूभाषी असलेला विलास तरे यांचा मनोर, सफाळे पट्टय़ातील गावांमध्ये असलेल्या संपर्कामध्ये परिवर्तन किती होते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबरीने शिवसेनेची बोईसर, मनोर व सफाळेच्या पश्चिमेच्या भागांत संघटनात्मक बांधणी असून त्याचा कितपत लाभ तरे यांना मिळतो हे पाहण्याजोगे आहे. शिवसेनेने बोईसरची जागा प्रतिष्ठेची केली असून या जागेकडे वरिष्ठांचे लक्ष आहे.
भाजपचा राजीनामा देऊन निवडणुकीत उभे राहिलेले संतोष जनाठे यांना भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छुपा पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संतोष जनाठे यांच्यासाठी प्रचार करत असून त्याचा लाभ त्यांना उत्तर भारतीय मतदारांना मिळण्याची शक्यता आहे. मनोर येथील रहिवासी असलेल्या जनाठे यांनी पालघरमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी केलेल्या कामांमुळे त्यांचा गावपातळीवर दांडगा संपर्क असल्याचे दिसून येते. बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेनामधील नाराज घटक संतोष जनाठे यांच्या मदतीला अखेरच्या क्षणी येतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. बोईसर, मनोर व सफाळे विभागात जनाठे यांना कितपत प्रतिसाद मिळतो याच्यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
वसई पंचायत समितीचे माजी सभापती तसेच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेले राजेश पाटील यांनी अल्पावधीत आपला ठसा उमटवला आहे. या मतदारसंघातील एकतृतीयांश भाग वसई तालुक्यातील असून या भागांत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्या भागात मिळणाऱ्या प्रतिसादावर पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.
तिकडे बोईसर व मनोर भागातील कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असून या भागांतील नागरिकांसाठी बाजूच्या तालुक्यातला उमेदवार असल्याचा प्रचार विरोधकांकडून सुरू करण्यात आला आहे. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाची मर्यादित ताकद असल्याने बविआला विजयासाठी आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.
मतदारसंघातील प्रमुख समस्या
- तारापूर औद्योगिक वसाहतीमधून होणारे प्रदूषण ही प्रमुख समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन अपयशी ठरले.
- औद्योगिक वसाहत तसेच सूर्या नदीलगतच्या पट्टय़ामध्ये स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा तसेच उद्योगांमध्ये स्थानिक नोकरभरतीची समस्या गंभीर आहे.
- या मतदारसंघातून बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग असे प्रकल्प जात असून येथील बाधित शेतकऱ्यांना जागेचा योग्य मोबदला मिळणे तसेच इतर सुखसोयी मिळणे याबद्दलचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
- तारापूर अणुऊर्जा केंद्रालगत असलेल्या या भागाला आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा अपेक्षित प्रमाणात नसल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
- सूर्या पाटबंधारे प्रकल्पातील लाभार्थ्यांना पाणी मिळत नसताना या नदीतील पाणी इतर शहरांना पिण्यासाठी पुरवण्यात येत आहे.
मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळात सातत्याने प्रयत्न केल. एमएमआर क्षेत्र पालघर तालुक्यापर्यंत विस्तारित करण्यासाठी पाठपुरावा केला. अनेक महत्त्वपूर्ण रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. – विलास तरे, उमेदवार, शिवसेना
विद्यमान आमदार तसेच बहुजन विकास आघाडीने दहा वर्षांत नेमके काय केले हे जनतेसमोर ठेवणे गरजेचे आहे. आपण अनेक वर्षे सामाजिक कार्यात असून नागरिकांसाठी उपलब्ध राहू. बोईसरच्या विकासासाठी प्रयत्नशील व कटिबद्ध राहू. – संतोष जनाठे, अपक्ष उमेदवार
वंचित, कष्टकरी तरुणांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न राहील. कौशल्य विकास शिबिरांचे आयोजन करून येथील बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करू. – राजेश पाटील, उमेदवार, बहुजन विकास आघाडी