भाजप प्रवेशाचा आग्रह? इंदापूरच्या राजकारणावर परिणाम
सोलापूर : राज्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला वरचेवर धक्के बसत आहेत. दोन्ही काँग्रेसमधील नेते भाजप वा शिवसेनेत दाखल होत आहेत. या पाश्र्वभूमीवर बुधवारी दुपारी अकलूजमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची काँग्रेसचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. भाजपमध्ये प्रवेश घेण्याबद्दल तातडीने निर्णय घेतो, असे सांगून हर्षवर्धन बावडय़ाकडे रवाना झाले.
काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर असलेले हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात आपल्या समर्थकांचा मेळावा घेत त्यामध्ये राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत भाजप प्रवेशाचे संकेत दिले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा सोडण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात पेच निर्माण झाला आहे. ही जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघातून अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणारे हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात हर्षवर्धन पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय समजले जातात. अलिकडे मोहिते-पाटील कुटुंबीयांनी राष्ट्रवादीशी नाते तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते-पाटील यांच्या ‘शिवरत्न’ बंगल्यावर हर्षवर्धन पाटील हे पुत्र राजवर्धन यांच्यासह दाखल झाले. या वेळी अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील हेदेखील हजर होते. या वेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ घातली. भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपणांस निश्चितपणे राजकीय ताकद मिळेल, असा विश्वास मोहिते-पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना देत भाजपमध्ये दाखल होण्याचा आग्रह केल्याचे सूत्रांनी सांगितले.