अभिनेत्री कंगना रणौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. त्यांच्या या विधानाचे गेले चार-पाच दिवस पडसाद उमटत होते. ‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असं कंगना रणौत म्हणाली होती. आपण तिला समर्थन दिल्यामागे स्वतःची काही कारणे होती, असं स्पष्टीकरण गोखले यांनी दिलं आहे.

यासंदर्भात भाष्य करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, “कंगना रणौत या मुलीने व्यक्त केलेली तिची मतं वैयक्तिक आहेत, माझीही वैयक्तिक आहेत. तिने तसं वक्तव्य केलं याला तिची कारणं आहेत आणि मी त्याला दुजोरा दिला याला माझी वेगळी कारणं आहेत. आमची ओळख नाही, संबंध नाही. तिच्याशी नसली तरी माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे. १८ मे २०१४ चा गार्डियन पेपर वाचा. त्यात जे लिहिलेलं आहे, तेच कंगना बोलली आहे. कंगना काहीच चुकीचं बोलली नाही, हे माझं मत मी बदलणार नाही. माझं भाषण माध्यमांनी पूर्ण दाखवलंच नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला. पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. १८ मे २०१४ ला खऱ्या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभं राहायला सुरूवात केली”.

काय आहे प्रकरण?

कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले, “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”

तसेच, “ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का? असं प्रश्न विचारला गेला असता विक्रम गोखले म्हणाले, आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे, की तुम्ही हे काय करत आहात? मी तर म्हणेण की यापुढे होणार कुठलाही मोठा खर्च त्याबद्दलचं ऑडीट हे जनतेला माहिती असलं पाहिजे, की आम्ही पैसे भरतो आहोत. आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर स्वीस बँकेत नेवून ठेवत नाही. कर भरतो हा सामान्य माणूस कर भरतोय त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या पैशांचं काय करत आहात? कंगनाच्या विधानाशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेलं आहे ते. मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नाही.” असंही यावेळी विक्रम गोखले यांनी बोलून दाखवलं.