बीड : मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी ज्या गावात विवेक सिंधू ग्रंथाची रचना केली होती. त्या अंबाजोगाईला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून एप्रिल महिन्यात बीड दौऱ्यावर असताना घोषणा केली. पुढील दोन महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असेही सांगण्यात आले. मात्र चार महिने उलटूनही याबाबतचा अध्यादेश न काढल्याने सामंत यांनी जाहीर केलेल्या पुस्तकांचे गाव ही केवळ घोषणाच राहिल्याचे दिसून येत आहे. घोषणांच्या पुढचे काम कोरेच अशी टीका आता होऊ लागली आहे.
उद्योग परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार बैठकीत सामंत यांनी अंबाजोगाईला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान अंबाजोगाईच्या पुस्तकांचे गाव उपक्रमासाठी समन्वय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची तर सहसमन्वयक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र तत्कालीन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काढले होते.
मात्र गेल्या चार महिन्यापासून या संदर्भात शासन दरबारी कुठलीच हालचाल झालेली दिसून न आल्याने पुस्तकांच्या गावचा प्रश्न राज्य शासनाचा अध्यादेश नसल्याने रखडलेला आहे. पुस्तकांचे गाव म्हणून घोषणा झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या एका आदेशाव्यतिरिक्त शासकीय स्तरावर कुठलीच हालचाल झालेली नाही. गेल्या काही काळात बीड जिल्ह्यात झालेल्या घटनाक्रम पाहता अंबाजोगाईला पुस्तकांचे गाव म्हणून मिळालेला बहुमान हा अभिमानाची बाब होता मात्र अध्यादेश नसल्याने हा बहुमान सध्यातरी प्रलंबितच राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
अंबाजोगाई पुस्तकांचे गाव म्हणून जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर स्थानिक साहित्यिक, वाचक यांचे पुस्तकांचे गाव संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये स्थानिकांनी पुस्तकाचे गाव उपक्रमासाठी सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. – दिपक वजाळे, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई तथा सह समन्वय अधिकारी – पुस्तकांचे गाव
‘अंबाजोगाई’ ला पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केल्यानंतर याबाबतचा अध्यादेश शासनाने काढणे गरजेचे होते. मात्र या बाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. शासनाने पुस्तकाचे गाव या संकल्पनेसाठी उपक्रम जाहीर करणे गरजेचे आहे. स्थानिक स्तरावर सामाजिक,सांस्कृतिक व साहित्यिक याबाबत पुढाकार घ्यायला तयार आहेत. – डॉ. नरेंद्र काळे, अंबाजोगाई