लातूर जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी मंदिर प्रवेशाशी संबंधित वादावरून स्थानिक दलित समुदायावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची घटना घडली आहे. यावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीनंतर हा वाद मिटला असून परिस्थिती आता सामान्य झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी निलंगा तहसीलमधील ताडमुगली गावात दोन दलित तरुणांनी हनुमान मंदिरात प्रवेश करून नारळ फोडला. त्यावरून वाद निर्माण झाल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. काही तरुणांनी त्यांच्या मंदिरात प्रवेश करण्यास आक्षेप घेतला आणि नंतर इतर जातीतील लोकांनी गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे.




दरम्यान, दलित कुटुंबासाठी धान्य दळण्यास नकार देणाऱ्या पिठाच्या गिरणी मालकाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. जर त्याने गावाच्या विरोधात जाऊन दळणासाठी कुटुंबाकडून १० रुपये घेतले तर त्याला नंतर ४० हजार रुपये दंड भरावा लागेल, असं व्हिडीओमध्ये गिरणी मालक म्हणताना ऐकू येतंय.
दरम्यान, यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक दिनेशकुमार कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या बैठका घेतल्या आणि वाद मिटवला असल्याचं सांगितलं. तसेच दलितांचा मंदिर प्रवेश हा वादाचा मुद्दा होता की नाही याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही.
“तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या गैरसमजातून हा वाद झाला. आम्ही शनिवारी सर्व गावकऱ्यांसोबत गाव शांतता समितीची बैठक आयोजित केली आणि त्यांनी माफी मागितली,” असे ते म्हणाले.