|| निखील मेस्त्री

पुनर्वसित चंद्रनगर, हनुमाननगर गावे भूमी अभिलेखाच्या नकाशावरच नाहीत

पालघर : सूर्या प्रकल्पातील कवडास व धामणी धरण उभारताना विस्थापित झालेल्या गावांचे चंद्रनगर व हनुमानगर असे पुनर्वसन झाले असले तरी ही गावे पालघर जिल्ह्याच्या भूमी अभिलेख नकाशावरून आजतागायत समाविष्ट करण्यात आली नाहीत. पुनर्वसनानंतर ४२ वर्षांपासून  गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पालघरमधील सूर्या प्रकल्प अंतर्गत धरणे तयार करताना या प्रकल्पातील प्रकल्पबाधित गावांचे पुनर्वसन चंद्रनगर व हनुमान नगर म्हणून नवीन गावे स्थापन करण्यात आली.  १९७८ ते १९८० च्या दरम्यान या गावात आदिवासी शेतकरी स्थानिक भूमिपुत्र आदींना जागा देण्यात आल्या. मात्र ही गावे पुनर्वसित करताना शासनाने देऊ केलेल्या विविध सुविधा आजतागायत येथील नागरिकांना मिळालेल्या नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर याच दोन्ही गावाच्या बाजूला असलेल्या धरणातून अजूनही या दोन्ही गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झालेले नाही असे येथील ग्रामस्थ सांगतात.

हनुमानननगर हे गाव पालघर तालुक्यात तर लगतचे चंद्रनगर गाव डहाणू तालुक्यात आहे.   ही दोन्ही गावे शासनाने पुनर्वसन अंतर्गत वसवली असली तरी या दोन्ही गावांचे भुमिअभिलेख नकाशेच घडलेले नाहीत. या दोन्ही गावातील शेत जमिनी, घराच्या जमिनी, प्लॉट, राखीव जमिनी, गाव नकाशे, गट नकाशे आदी नकाशे भुमिअभिलेख कार्यालयामार्फत ४२ वर्षांनंतरही तयार होणे प्रलंबित आहेत. अलीकडच्या काळात पालघर तालुक्यातील हनुमाननगर  गाव हे अधिसूचनेद्वारे महसुली गाव घोषित करण्यात आले. त्यानंतर या गावाच्या काही जमिनीचे सात- बारा उतारे तयार आहेत. तर काही जमिनीचे सात- बारे तयार होण्याचे काम सुरू आहे. या सातबारा मध्येही अनेक त्रुटी आढळून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी सात- बारा मिळाले असले तरी गाव नकाशा अजूनही तयार झालेला नाही. दोन्ही गावाच्या गाव नकाशावर शासकीय जमिनींचाच उल्लेख आहे.

चंद्रनगर गावची लोकसंख्या २३५० तर हनुमाननगर गावची लोकसंख्या १६०० इतकी आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही गावे लगत असली तरी त्यांची विभागणी पालघर व डहाणू तालुक्यात करण्यात आली आहे.चंद्रनगर हे गाव डहाणू तालुक्यात तालुक्याअसले तरी या गावातील ४० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पालघर तालुक्यातील हनुमाननगर मध्ये आहेत. शेतीविषयक शासकीय कामे करताना चंद्रनगरच्या शेतकऱ्यांची यामुळे ससेहोलपट होत आहे. पालघरमध्ये येऊन त्यांना आपली कामे करून घ्यावी लागत आहेत. या दोन्ही गावांची मोजणी न झाल्याने गावातील घरे, जमिनी यांचे चतु: सीमांकन झालेले नाही. त्यामुळे हद्दनिश्चिती होत नाही. परिणामी येथील गावकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढत आहे. या दोन्ही गावांचे नकाशे घडलेले नाहीत अशी पुष्टी जिल्हा पुनर्वसन व जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडून केली आहे.

मोबदल्यापासूनही वंचित

सुर्या प्रकल्पातून विस्थापन केल्यानंतर आता पूनर्वसन केलेल्या चंद्रनगर गावात जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जमिनी देण्यात आल्या. मात्र त्याच जमिनीत कालवे बांधून ती जमीनही प्रकल्पासाठी घेतली गेली व त्याचा मोबदला गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात आलेला नाही. चंद्रनगर गावच्या अभिलेख नकाशा तयार करण्यासंबंधीची प्रक्रिया भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सुरू आहे. – संजय तळेकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख डहाणू

आम्ही या भारताचे व पालघर जिल्ह्याचे नागरिक आहोत. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. तो मिळावा हीच अपेक्षा आहे. – त्रिंबक अवतार, पुनर्वसन व गाव विकास समिती चंद्रनगर

पुनर्वसनाच्या ४२ वर्षानंतरही आम्हा गावकऱ्यांना स्वत:च्या हक्कासाठी संघर्ष करावा लागतोय. शासनाने पुनर्वसन करताना प्रकल्प बधितांची घोर फसवणूक केली आहे. आजही अनेक अडचणी कायम आहेत.n– प्रताप सांबर, उपसरपंच,चंद्रनगर