नाशिकमधील इगतपुरीत संतप्त जमावाने दोन पोलिसांना बेदम मारहाण केली आहे. पोलिसांच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाल्याने ही घटना घडली.
ग्रामपंचायत सदस्य बाळू खोडकेला समन्स बजावण्यासाठी दोन पोलीस खेड भैरव गावात पोहोचले. अवैध दारुविक्रीबद्दल हे समन्स बजावण्यात आले होते. यावेळी या दोन पोलिसांनी बाळू खोडकेला मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यावेळी बाळू खोडकेचे डोके एका दगडावर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी दोन्ही पोलिसांनी जबर मारहाण केली.
यानंतर खेड भैरवचे ग्रामस्थ बाळू खोडकेचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाळू खोडकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यानच्या काळात बाळू खोडकेला मारहाण करणारे दोन्ही पोलीस बेपत्ता झाले. मात्र काही वेळानंतर हे पोलीस सापडले. मग त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी जबर मारहाण केल्याने बाळू खोडकेचा मृत्यू झाल्याचा खेड भैरव गाम्रस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामस्थ अतिशय संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बाळू खोडकेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खेड भैरव ग्रामस्थांनी केली आहे.