सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच चालू आहे. या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज (२७ मार्च) त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १७ उमेदवारांची नावं असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु, त्यास काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. त्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून पाठिंबादेखील आहे. परंतु, ठाकरे गटाने महाविकास आघाडीत या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी आज (२७ मार्च) दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली. या भेटीनंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, आम्ही पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितलं आहे की, ही जागा आपल्याला मिळायला हवी.

आमदार विश्वजीत कदम म्हणाले, मी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची लोकसभा दिली जाईल असं कधीच ठरलं नव्हतं. कारण ते आम्हाला मान्य नाही. छत्रपती शाहू महाराज (दुसरे) ज्या पक्षातून कोल्हापूरची लोकसभा लढवतील त्या पक्षातून त्यांना तिकीट दिलं जाईल असं महाविकास आघाडीत ठरलं होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःहून काँग्रेस पक्ष निवडला. शिवसेनेची (ठाकरे गट) इच्छा असल्यास त्यांनी हातकणंगलेची जागा लढावी. त्यांनी राजू शेट्टी यांना त्यांच्या पक्षात घ्यावं आणि ती जागा लढवावी.

हे ही वाचा >> “मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

आमदार कदम म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की, काँग्रेस पक्ष निश्चितपणे सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा सर्व नेत्यांशी बोलेल. खरगे स्वतः शिवसेनेशीदेखील बोलू शकतात.” दरम्यान, यावेळी कदम यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवणार का? त्यावर कदम म्हणाले, माझा सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. पक्षानेही त्याला दुजोरा दिला आहे. मी एवढंच सांगू शकतो की मला यावर चर्चा करायची नाही. आम्हाला खात्री आहे की, काँग्रेस पक्षनेतृत्व ही जागा महाविकास आघाडीत आपल्याकडे घेईल यासाठी प्रयत्न करेल. अगदी शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर आम्ही तयार आहोत. पक्षाचा आदेश मिळाला तर आम्ही ही लढाईदेखील लढू.