राहाता: भाजपचे नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमध्ये मतचोरीच्या आरोपावरून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवरून थोरात व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यामध्ये पुन्हा परस्परांवर टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. आम्हाला लहान मुलांवर बोलायला लावू नका, असा टोला थोरात यांनी लगावला होता तर आम्हाला लहान म्हणण्याची चूक तुम्ही केलीत. लहानांनीच तुमचा पराभव केला, असे प्रत्युत्तर सुजय विखे यांनी दिले आहे.
लोणी येथील कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्याबाबत बोलताना मला पोराबाळांवर बोलायला लावू नका, पोराबाळांना सांगा काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा. असा खोचक टोला लगावला होता. त्यावर सुजय विखे यांनी प्रत्युत्तर देताना थोरात पोराबाळांवर बोलत नाहीत तर विधानसभेला प्रत्येक भाषणात माझ्याबद्दल का बोलले? अमोल खताळ यांना खबऱ्या का म्हणाले? सुजय विखे काट्याकुट्यातून पळाले असे का म्हणाले? तेव्हा आम्ही पोरबाळ नव्हतो का? तुमचा पराभव झाल्यावर आम्ही पोरंबाळ झालो का? थोरात यांनी आम्हाला पोरंबाळ म्हणण्याची चूक केली आणि पोराबाळांनी त्यांचा पराभव केला. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, हे त्यांना पचत नाही. आम्ही ४० वर्षे संघर्ष करत आहोत. भविष्यातील परिस्थिती हाताळायला आम्ही समर्थ आहोत, असे प्रत्युत्तर विखे यांनी दिले.
थोरात यांच्या शिर्डीतील बोगस मतदानाच्या आरोपावर बोलताना सुजय विखे म्हणाले, की निवडणुकीपूर्वी मतदारयादी उपलब्ध असते. अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी हरकती घेण्यासाठी संधी असते. राहुल गांधींच्या आमदारांनी यादी प्रसिद्ध होण्याआधी आक्षेप का घेतला नाही? निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितल्यावर राहुल गांधी मागे का सरकले? हा फक्त फुसका बॉम्ब आहे. जनतेने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाकारले, या नैराश्यातून काँग्रेसकडून बोगस मतदानाचे वक्तव्य केले जात आहे. राहुल गांधींना वीस वर्षांपूर्वीही लोक नाकारत होते, आताही नाकारत आहेत.
विधानसभेसारखाच ‘स्थानिक’चा निकाल
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता आमच्याबरोबर राहील असा विश्वास आहे. जनता आजही त्यांच्याबरोबर नाही. त्यांच्या (थोरात) बैठकांना जातात आणि तेच लोक आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगतात. थोरात यांनी आपले वक्तव्य बदलले नाही तर जनता पुन्हा विधानसभेसारखा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देतील, असा इशाराही विखे यांनी दिला.