जिल्ह्य़ातील वायगावी हळद आता राष्ट्रीय मानांकन प्राप्त होण्याच्या मार्गावर असून मानांकन प्राप्त झाल्यानंतर या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्य़ातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हे ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत असून कित्येक दशकांपासून या उत्पादनाने गावाला हळदीची ओळख प्राप्त झाली आहे. याच हळदीने आता इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून मानांकनाच्या दिशेने अग्रक्रम गाठला. महाराष्ट्र कृषी उत्पादन प्रकल्पांतर्गत वायगाव हळद उत्पादक संघाला त्या दृष्टीने चालना देण्यात आली. जिऑग्रॉफि कल इंडेक्स (जी.आय.) हा दर्जा मिळावा म्हणून पुणे येथील जीएमजीसी या संस्थेने राज्यातील दहा कृषी उत्पादनांची नोंद केली असून त्यापैकी वायगावी हळद एक आहे.
या हळदीची सांगली, सेलम किंवा जळगावी हळदीपेक्षा वेगळी गुणवैशिष्टय़े सांगितली जातात. यात करक्युमिन तेलाचे प्रमाण सहा टक्के असून हस्तोद्योगातून ते प्रमाण आठ टक्क्यांपर्यंत वाढते. सोबतच आगळी चव, तेलाचे प्रमाण, सुगंध व औषधी गुणधर्म या वैशिष्टय़ांवर वायगावी हळद अद्वितीय ठरते. प्रामुख्याने सेंद्रीय पद्धतीने उत्पादन होणाऱ्या या हळदीची लोणच्यासाठी खास मागणी होते. सेंद्रीय शेतीचे तज्ज्ञ मनोहर परचुरे यांनी कर्करोग्यांच्या उपचारासाठी या हळदीची कॅप्सूल तयार केली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. एचआयव्हीग्रस्तांसाठी विषाणूरोधक म्हणून उपयोग करण्याचा अभ्यास होत आहे. प्रामुख्याने वायगावी हळदीत वैद्यकीय गुणधर्म ओतप्रोत भरले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बचाटे यांनी दिली.
टरमेरॉन, अ‍ॅटलांटोन व झिंगीवेरन या औषधी मूलद्रव्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. मेंदूजन्य विकारावर ही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सर्दी-पडसे या विकारावर आयुर्वेदिक उपचारात तिचा प्रामुख्याने उपयोग होतो, असे मानांकन प्राप्त करण्याच्या हेतूने झालेल्या सादरीकरणात या हळदीची वैशिष्टय़े सांगताना नमूद करण्यात आले. या अशा बहुगुणी हळदीने भारताबाहेर चीन, तैवान, हाँगकाँगही गाठले आहे.
जी.आय. मानांकन प्राप्त झाल्यानंतर हळदीच्या बाजारमूल्यात लक्षणीय वाढ होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळणे शक्य होणार असून त्यामुळे वायगावचे शेतकरी व बचतगटाच्या महिलांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मानांकनप्राप्तीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत.
कृषी खाते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waigaon turmeric on way to get national tag
First published on: 31-07-2014 at 05:01 IST