शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत व्यक्तिगत चारित्र्यहनन करणारी भाषणे केली जात असून, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.
लोखंडे यांच्या प्रचारसभेत सेनेचे आमदार अशोक काळे यांनी वाकचौरे हे साईबाबा संस्थानमध्ये एजंटगिरी व दलाली करत होते. त्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद, चेन्नई आदी शहरांमध्ये मोठी संपत्ती जमा केली आहे. ते लबाड आहेत, असे व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले होते. तसेच विजय वहाडणे यांनी शहरातील सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी एका ठेकेदाराकडे ५ कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप केला होता. सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, ससाणे व वाकचौरे यांच्यावर आरोप सुरू केले आहेत. त्यासंदर्भात आता वाकचौरे यांनी जाहीर तक्रार केली आहे. विरोधक सभांमधून जी भाषणे करतात ते आचारसंहितेत बसते का, भाषणाच्या चित्रफिती आयोगाकडे आहेत. त्यांनी त्या तपासाव्यात, निवडणूक यंत्रणा काय करत आहे? असा सवाल करून जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षकांनी कारवाई करावी, अन्यथा आपण हे सहन करणार नाही असे स्पष्ट केले.
वाकचौरे यांनी पक्षांतर केले म्हणून त्यांना काळे झेंडे दाखविणे, काळी शाई गाडीवर फेकणे, निदर्शने करणे, सभा होऊ न देणे असे प्रकार अनेक गावांत घडले. त्यासंदर्भात वाकचौरे म्हणाले, मी एकदा पक्ष बदलला तर मला काळे झेंडे दाखवता, पण लोखंडे यांनी तीनदा पक्ष बदलला त्यांचे स्वागत करता, हा काय प्रकार आहे. मी पक्ष सोडला हा खरा मुद्दा नाही, पण त्यामागे षडयंत्र आहे. हे कोण करायला लावतो, त्यामागे काय कारण आहे हे मला माहीत आहे. यामागे काही लोकांचे हितसंबंध आहेत. आजपर्यंत माझ्या नावाचा वापर करून दोन नंबर धंदे चालविले. आता ते दडपता येणार नाहीत, त्यामुळे अशा मंडळींचे हे उद्योग आहेत. पण पुढील कालखंडात असे वागणार असाल तर ते मी चालू देणार नाही, असा इशारा खासदार वाकचौरे यांनी दिला.
‘यांचा’ही तोल ढळला…
आमदार काळे यांनी एजंटगिरीचा आरोप केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या वाकचौरे यांनी आचारसंहिताभंगाबद्दल तक्रार केली असली तरी स्वत:ही चारित्र्यहनन करणारे विधान केले. काळे व लोखंडे यांची मैत्री मुंबईत डान्स बार की बारमध्ये झाली, असे वक्तव्य वाकचौरे यांनी केले. त्याचीही दखल आता आयोगाला घ्यावी लागणार आहे.