मंदार लोहोकरे
ऊन- वारा- पावसाची तमा न बाळगता शेकडो मैल चालत येऊन सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित आहे. मात्र सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी आणि पालखी सोहळा होणार का, हा प्रश्न लाखो भाविकांत आहे. आळंदी आणि देहू संस्थान यांनी वारीची परंपरा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. ‘माझी जिवेची आवडी.. पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगाप्रमाणे आषाढी वारीबाबत वारकरी संप्रदाय ठाम आहे. यासाठी एक कृती आराखडा सरकारला सादर करण्यात येणार आहे.
समतेची पताका खांद्यावर, कोणी उच्च नाही, स्त्री-पुरुष समानता, एकमेकांच्या पायी पडणारे, आपली शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारे म्हणजे वारकरी. एकीकडे पावसाची चाहूल लागत असताना दुसरीकडे विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागत असते. चैत्र वारीच्या वेळेस आषाढी वारीबाबत पहिली बैठक होते व तयारीला सुरुवात होते. प्रत्येक पालखीचा मुक्काम, सकाळची न्याहरी, दुपारी जेवण, कोणत्या ठिकाणी गोल तर कोणत्या ठिकाणी उभे रिंगण हे ठिकाण निश्चित केले जाते. प्रस्थान कधी होणार हेदेखील ठरलेले. असा एखाद्या लष्करी शिस्तीप्रमाणे आणि मोठय़ा उत्साहात पालखी सोहळा निघत असतो.
मात्र सध्या करोनाचे संकट घोंघावत आहे. पंढरपूरचे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहे. तर वारकरी संप्रदायातील महत्त्वाची चैत्री यात्रा या करोनामुळे भाविकांनी पंढरपुरात येऊ नये असा धाडसी निर्णय महाराज मंडळींनी घेतला. मात्र आता आषाढी सोहळ्याबाबत यंदा वारी, पालखी सोहळा होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग पसरू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागणार आहे. टाळेबंदीमुळे पंढरीनगरी ओस पडली आहे. आता या पंढरीत आषाढीच्या निमित्ताने पुन्हा टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष कानी येऊन पंढरीनगरी गरजू दे, असे साकडे विठ्ठलाकडे भाविक घालत आहेत.
सरकारच्या पातळीवर अद्याप सावध भूमिका घेण्यात येत आहे. अजून करोनाचे संकट कमी झालेले नाही. वारीला मर्यादित स्वरूपात परवानगी द्यावी, असा प्रस्ताव असला तरी गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान असेल. या प्रश्नावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
पालखी प्रस्थानाचे नियोजन
* संत निवृत्तिनाथ – ६ जून – त्र्यंबकेश्वर
* संत ज्ञानेश्वर – १३ जून – आळंदी
* संत सोपानदेव – १८ जून – सासवड
* संत मुक्ताई – २७ मे – मुक्ताईनगर
* संत तुकाराम – १२ जून – देहू
* संत एकनाथ – १२ जून – पैठण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकरी, महाराज मंडळी यांची नुकतीच दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टी लावणे, योग्य अंतर ठेवणे, वैद्यकीय तपासणी करणे या सर्व सरकारच्या आरोग्याबाबतच्या सूचनांचे पालन केले जाईल. प्रमुख संतांच्या पालखीप्रमुखांची बैठक होणार असून त्यात एक आराखडा सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य ती भूमिका घेऊ. मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ देणार नाही.
– ह.भ.प. देवव्रत वासकर