प्रशांत देशमुख
वेळेवर प्राणवायूचा पूरवठा कमी पडल्याने सावंगी येथील रूग्णालयावर आलेले संकट समाजसेवी सचिन अग्निहोत्री यांनी धावाधाव करीत सिलेंडरचा पूरवठा केल्याने अखेर टळले. सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशॅलिटी या विदर्भातील सर्वाधिक करोना रूग्ण हाताळणाऱ्या खासगी रूग्णालयात बुधवारी सकाळी प्राणवायूचे संकट ओढवले होते. शासनाकडून या रूग्णालयास प्राणवायूचा पूरवठा होत असतो. पण थोडे नियोजन विस्कटल्याने वेळेवर प्राणवायूसाठी धावाधाव सुरू झाली.

रूग्णालयाने प्राणवायूसाठी संपर्क सुरू करतांनाच काही समुहांना आवाहनही केले. त्याला तत्परतेने प्रतिसाद येथील युवा उद्योजक व सामाजिक दायित्व जोपासणारे सचिन शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिला. त्यांनी लगेचच देवळीच्या औद्योगिक वसाहतीतून पाच सिलेंडर उपलब्ध करून दिले. मात्र ते पूरेसे नसल्याने वेल्डिंग शॉप व अन्य ठिकाणाहून अक्षरश: वेचून आणले.

प्राणवायूचा निम्मा टॅकर भरेल एवढे हे सिलेंडर लगेच जमा झाल्याने रूग्णांना सुरळीत पूरवठा वेळीच सुरू झाला. रूग्णालय प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. शिवाय जमा असलेल्या प्राणवायूचे वहन करण्यासाठी रिकामे जंबो सिलेंडर आवश्यक ठरले होते. ते देखील पूरविण्याची तत्परता अग्निहोत्री यांनी दाखविली.

रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललीत वाघमारे म्हणाले की ही आज मोलाची मदत झाली. विभागीय आयुक्तांनी आणखी पन्नास रूग्णखाटा वाढविण्याची सूचना केली आहे. त्यामूळे मदतीचे हात अपेक्षितच आहे. आज रामनवमीच्या दिवशी अग्निहोत्री यांनी केलेली मदत संजीवनी बुटीप्रमाणेच मोलाची ठरल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले. या मदतीबद्दल बोलतांना अग्निहोत्री म्हणाले की सहकाºयांच्या मदतीने केलेली ही एक छोटीसी सेवा आहे. सावंगीचे रूग्णालय मानवतेचे महान कार्य करीत आहे. प्रत्येकानेच सहकार्य करावे, अशी माझी भावना आहे.