उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या पाणीटंचाईचा विचार न करता उजनीसह रुईभर मध्यम प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मागील दोनतीन दिवसांपूर्वी रुईभर ते उस्मानाबाद मुख्य जलवाहिनी देवळालीनजीक फुटली. परंतु प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाअभावी रुईभर धरणातून उस्मानाबाद शहरासाठी वारेमाप पाणीउपसा सुरू असून, धरण परिसरातील गावांमध्ये मात्र तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
तालुक्यातील रुईभर व तेरणा धरणात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. तेरणा धरणात सध्या फक्त १८० दशलक्ष घनमीटर व रुईभर धरणात ३३५ दलघमी पाणी शिल्लक आहे. या उरल्यासुरल्या पाण्यावरच रुईभरसह परिसरातील गावांना अवलंबून राहावे लागणार आहे. पावसाळा सुरू होण्यास आणखी महिना-दीड महिना आहे. त्याआधीच रुईभर धरणातून उस्मानाबाद शहरासाठी वारेमाप पाणीउपसा केला जात आहे. परिणामी, परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. उस्मानाबाद शहरासाठी कोटय़वधी रुपये खर्चून उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणीयोजना अमलात आणण्यात आली. मात्र, त्याचे वीजबिल भरणे पालिकेला परवडत नसल्याच्या नावाखाली तेरणा व रुईभर धरणांतून मोठय़ा प्रमाणात शहरासाठी पाणीउपसा केला जात आहे.
रुईभर-उस्मानाबादपर्यंतची मुख्य जलवाहिनी देवळाली पुलानजीक फुटली. जवळपास एक फूट जलवाहिनी उभी चिरली गेल्यामुळे मागील तीन दिवसांपासून अक्षरश: लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ऐन रस्त्यालगत असलेली ही जलवाहिनी फुटल्याने रस्त्यालगत पाणीच पाणी झाले. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाला कल्पना देऊनही जलवाहिनीकडे कोणीही फिरकले नव्हते.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळीची लोकसंख्या जवळपास २० हजारांहून अधिक आहे. ग्रामपंचायतीकडून मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाणी आरक्षित करण्याची मागणी केली जात आहे. गावाच्या पाणीपुरवठय़ासाठी तलावातील विहिरीचे पाणी सध्या कमी झाले आहे. टँकरचे प्रस्तावही आश्वासनापलीकडे सरकत नसल्याने ग्रामस्थांमधून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील अनेक वर्षे पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद शहरात यंदा पाणीटंचाई जाणवत नाही. शहराला सध्या उजनी धरणातून ७० टक्के व रुईभर धरणातून ३० टक्के पाणीपुरवठा केला जातो. रुईभर धरणातील पाणी कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिकेने ६० लाख रुपये खर्चून शेकापूर साठवण तलावातून पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. येत्या चारपाच दिवसांत हे काम पूर्ण होईल. उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या १०-१२ तास पंपिंग होते. मात्र, पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्यास जवळपास २०-२२ तास पंिपग होऊन शहराला मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2015 रोजी प्रकाशित
मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याची उधळपट्टी
उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या पाणीटंचाईचा विचार न करता उजनीसह रुईभर मध्यम प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.

First published on: 23-05-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste of water in burst water pipeline