सर्वसामान्य जनतेमध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत जागृती घडवून आणण्यासाठी आजपासून (१६ मार्च) जिल्ह्य़ात जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ाच्या सर्व तालुक्यांमध्ये या सप्ताहानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांबाबत माहिती देताना कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए. ए. दाभाडे यांनी सांगितले की, आज सकाळी जिल्ह्य़ातील वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री (संगमेश्वर), काजळी (रत्नागिरी), मुचकुंदी (लांजा) आणि अर्जुना (राजापूर) या नद्यांचे कलश पूजन करण्यात येणार आहे. तसेच सिंचनासाठी पाणी वापरासंबंधी कायदे व नियमांबाबत लाभधारकांमध्ये जागृती निर्माण करणे, सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्यांच्या संरक्षणाची गरज, सिंचन व्यवस्थापनाच्या शिस्तीचे पालन, पाणी वापर संस्थांचे महत्त्व आणि फायदे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घेण्याची काळजी, सूक्ष्म सिंचन पद्धतीचे महत्त्व इत्यादीबाबत जलसंपदा विभागातर्फे मेळावे, चर्चा, व्याख्याने इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे धरण क्षेत्रात शेतकऱ्यांच्या सहली, भित्तिफलकांद्वारे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी, पशूसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग, पर्यावरण व उद्योग यांसह विविध यंत्रणांना सहभागी करून घेतले जाणार आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन व जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करून या सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. याच वेळी चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या किनारी गांधारेश्वर मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १७, १८ आणि १९ मार्चला तालुका स्तरावर तहसील कार्यालय, धरणक्षेत्र, महाविद्यालयात जलपूजन, व्याख्याने, चर्चासत्र, जल दिंडी इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. २१ मार्च रोजी गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. येत्या रविवारी (२० मार्च) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दौड आयोजित करण्यात आली आहे.