डहाणू नगरपरिषदेकडून दखल
डहाणू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी सरावली तलावपाडा येथे ही जलवाहिनी फुटली होती.
फुटलेल्या जलवाहिनीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. तलावपाडा परिसरातील वसाहतींमध्येही पाणी साचले होते. ‘लोकसत्ता’ने मंगळवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच नगरपरिषद प्रशासनाने ही जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. तात्काळ गळती शोधून कार्यवाही करण्यात आली.
वाणगावजवळच्या साखरा धरणातून या जलवाहिनीद्वारे डहाणू नगरपरिषद क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. तलावपाडा परिसरात ही जलवाहिनी फुटल्यानंतर या परिसराला तलावाचे स्वरूप झाले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास झाला.
जलवाहिनी फुटल्याने घराभोवती पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. मात्र नगरपरिषदेने कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. – रशीद शेख, रहिवासी, तलावपाडा