पुणे जिल्ह्य़ात पावसाचा जोर प्रचंड वाढल्यामुळे तेथून उजनी धरणात सोडलेल्या पाण्याचा विसर्ग तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त क्युसेकने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची वाटचाल शंभर टक्के भरण्याकडे वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे धरण झपाटय़ाने भरत पाण्याचा साठा १०५ टीएमसीपर्यंत वाढला आहे. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत धरण ७५.९६ टक्के भरले होते. दरम्यान, माळशिरस तालुक्यातील वाघोलीजवळ भीमा नदीच्या पात्रात एक शेतकरी वाहून गेला.

संतोष विष्णू पाटील (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यानंतर लगेचच बारा बोटींचा वापर करीत गावक ऱ्यांनी शोधकार्य हाती घेतले आहे. भीमा आणि नीरा नदीचे पाणी वाढले आहे. नदीलगत शेती असलेल्या संतोष पाटील शेतातील विद्युत पंप काढून घेण्यासाठी नदीकाठी गेला होता. तेव्हा तो अचानकपणे नदीत वाहून गेला. त्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागला नव्हता. उजनी धरणात वाढणाऱ्या पाण्याची पातळी विचारात घेता धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा वेग वाढला आहे. धरणातून भीमा नदीच्या पात्रात ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर धरणाच्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग ३२०० क्युसेक आणि बोगद्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग १२०० क्युसेक आहे. धरणावरील सुरू असलेल्या वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग १६००क्युसेक होता. दुसरीकडे बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग एक लाख २३ हजार क्युसेक तर त्यापेक्षा जास्त विसर्ग दौेड येथून दोन लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.  दरम्यान, उजनी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात करमाळा तालुक्यात पाणी वाढल्यामुळे तेथील विद्युत मोटारी काढून घेण्यासाठी शेतक ऱ्यांची धांदल उडाली आहे.

उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त वाढल्यामुळे धरणाच्या परिसरासह सोलापूर जिल्ह्य़ात भीमा नदीकाठी पूर परिस्थितीचा धोका वाढला आहे. धरणात सायंकाळी सहापर्यंत पाणीपातळी ४९५.६९० मीटर होती. तर एकूण पाणीसाठा २९५५.४७ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाणीसाठा ११५२.६६ दशलक्ष घनमीटर होता.