सांगली : पश्चिम घाटातील धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला असून महापुराच्या भीतीस कारणीभूत ठरणारे कर्नाटकातील अलमट्टी धरण काठोकाठ भरले आहे. गेले दोन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली असून तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील गावपुलावरून एक जण वाहून गेला असून शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.

कोयना, धोम, कण्हेरसह चांदोली धरणातील पाणीसाठा क्षमतेच्या ९०  टक्क्यांहून अधिक झाला आहे. मात्र, या धरणातील सोडलेले पाणी आणि कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्यावर कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठा  १२३  टीएमसी झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक २२  हजार  ५००  क्युसेक  असताना विसर्ग २५ हजार  क्युसेक करण्यात येत आहे.

  पश्चिम घाटातील धरणात शुक्रवारी सकाळी झालेला पाणीसाठा असा, कंसामध्ये क्षमता कोयना  ९९.९५  ( १०५.२५ ), धोम  १३ ( १३.५ ), कण्हेर  ९.६३  ( १०.१० ), चांदोली  ३३  ( ३४.४० ), दूधगंगा  २२.२१  ( २५.४० ), राधानगरी  ७.९९  ( ८.३६ ), पाटगांव ३.६६  ( ३.७२ ), धोम बलकवडी  ३.८४ ( ४.०८ ), उरमोडी   ९.६०  ( ९.९७ ) आणि तारळी  ५.५४  ( ६.८५ ). सध्या केवळ दूधगंगामधून  २  हजार  ४३५  क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या  २४  तासात जिल्ह्यात  ९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक  २७.७  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तासगाव तालुक्यात सलग पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काल रात्री झालेल्या पावसाने मांजर्डे येथील यलम्मा ओढा पात्रावरील पुलावरून पाणी वाहत होते. आज सकाळी विजय बाळकृष्ण जाधव (वय  ४७ ) हा पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. बचाव पथकाने शोध घेतल्यानंतर त्याचे पार्थिव शुक्रवारी दुपारी मिळाले.