शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने गावे, वस्त्या, तांडे तहानली असून, ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तब्बल ५५ गावे, तसेच ११४ वाडय़ांना हा पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लोकांची पाण्यासंदर्भात ओरड कायम आहे.
जिल्ह्य़ात तापमानाने चाळिशी ओलांडली. दररोज तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीसाठय़ावर होऊ लागला आहे. जिल्ह्य़ात एकूण १४१ प्रकल्पांमध्ये १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण ३०३ दलघमी पाण्यापकी १८० दलघमी पाणी मृतसाठय़ात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे अनेक गावांतून टँकरची मागणीही वाढू लागली आहे. सध्या ५५ गावे व ११४ वाडय़ांना ६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात टँकरची संख्या ३४ होती. मे च्या पहिल्याच आठवडय़ात त्यात दुपटीने वाढ झाली.
आष्टी तालुक्यात १५ टँकर वाढले असून आता ४८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बीड तालुक्यात १२, तर शिरूर तालुक्यात एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अंबाजोगाई, केज व धारूर तालुक्यात पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव धरणात मृतसाठा शिल्लक आहे. या तिन्ही तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा फटका जिल्ह्य़ातील प्रकल्पांना बसू लागला आहे. विशेषत मोठय़ा धरणातील पाणीसाठय़ावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. विविध तालुक्यातील गावातून, वस्ती, तांडय़ांवरूनही टँकरचे प्रस्ताव पंचायत समित्यांमार्फत प्रशासनाकडे दाखल होऊ लागले आहेत.
अवकाळीने पुन्हा झोडपले
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्य़ात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी दुपारनंतर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बीड शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. चार दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसात वादळाचा व विजेचा तडाखा बसून तिघांना आपला जीव गमवावा लागला.