scorecardresearch

पाणीपुरवठा आणखी दोन दिवस विस्कळीत

शहर पाणीपुरवठा योजनेच्या पाणी उपसामध्ये काल, गुरुवारी सायंकाळपासून, गेल्या चोवीस तासात तीनवेळा विघ्न आल्याने शहर व उपनगराचा पाणीपुरवठा कालपासून विस्कळीत झाला आहे.

शहर पाणी योजनेत लागोपाठ तीनदा बिघाड

नगर : शहर पाणीपुरवठा योजनेच्या पाणी उपसामध्ये काल, गुरुवारी सायंकाळपासून, गेल्या चोवीस तासात तीनवेळा विघ्न आल्याने शहर व उपनगराचा पाणीपुरवठा कालपासून विस्कळीत झाला आहे. तो आणखी पुढील दोन दिवसासाठी विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे रोटेशननुसार होणाऱ्या भागाला दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. गुरुवारी (दि. २०) सायंकाळी महावितरणकडून पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरू झाल्यानंतर मनपाच्या विळद उपसा केंद्रात तांत्रिक बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जात असतानाच आज, शुक्रवारी  पहाटे योजनेचे रोहित्र नादुरुस्त झाले. रोहित्र दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच पाणी उपसा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यामुळे कालपासूनच मुळानगर येथून होणारा पाणी उपसा सलग २४ तास बंद आहे.

परिणामी काल सायंकाळी स्टेशनरस्ता भागास पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तो उद्या, शनिवारी (दि. २२) करण्यात येईल. तसेच आज सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रस्ता परिसर, स्टेशन रस्ता, विनायकनगर, आगरकर मळा या भागासह बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सुय़नगर, निर्मलनगर, मुकूंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरास भागास पाणीपुरवठा झाला नाही. तो आता उद्या, शनिवार (दि. २२) करण्यात येईल. शनिवार (दि.२२) मंगलगेट, रामचंद्रखुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कालनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर बुरूडगांव रस्ता या भागास रविवारी (दि. २३) पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply disrupted breakdown ysh

ताज्या बातम्या