अजित पवार सरकारमध्ये आल्याने शिंदे गट नाराज आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी या चर्चा खोडून काढल्या आहेत. अशी कुठलीही नाराजी शिंदे गटात नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गटातले आमदार नाराज झाले आहेत. किमान २० आमदार वेगळा निर्णय घेतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याला आता संदीपान भुमरे यांनी उत्तर दिलं आहे. तसंच विनायक राऊत यांचाही दावा त्यांनी खोडला आहे.

संदिपान भुमरे यांनी काय म्हटलं आहे?

“शिवसेनेचा (शिंदे गट) एकही आमदार त्यांच्या (ठाकरे गट) संपर्कात नाही. उलट त्यांचे जे उरलेले आमदार आहेत तेच आमच्या संपर्कात आहेत. त्या आमदारांचीही येण्याची इच्छा आहे. लवकरच तिकडचे काही आमदार इकडे आलेले बघायला मिळतील.” असं भुमरेंनी म्हटलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या अंगावर आमदार धावून गेले अशी चर्चा आहे याविषयी विचारलं असता भुमरे म्हणाले, “जो आरोप होतो आहे त्यात काही तथ्य नाही. असं होणं शक्य आहे का? आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत. आमच्यातला एकही आमदार शिंदेंचा निर्णय डावलणार नाही.”

विनायक राऊत यांनी काय म्हटलं होतं?

अजित दादा आणि कंपनीने तिथे (शिंदे-भाजपा सरकारमध्ये) उडी मारली, त्याचदिवशी शिंदे गटातील आमदारांनी चळवळ करायला सुरुवात केली आहे. त्यांचा होत असलेला उद्रेक आणि तो थांबवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट पाहिल्यानंतर खूप दयनीय अवस्था झालेली आहे. त्यानंतर आता खूप जणांनी आता आम्ही ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ अशी वक्तव्य काही लोकांकडून आल्याचं मी पाहिलंय. त्या उपरसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोक म्हणताहेत, जे होतं तेच बरं आहे, पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी असं वाटतंय अशी चर्चा चालू आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ ते दहा आमदारांनी संपर्क साधला

शिंदे गटात अस्वस्थता असल्याने बंडखोरी केलेले अनेक आमदार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, अशाप्रकारे आठ ते दहा आमदारांनी संपर्क साधल्याचा दावा विनायक राऊतांनी केला. ते म्हणाले की, “आठ ते दहा आमदारांनी गेल्या दोन दिवसांत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधला आहे.”