शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच ऑनलाइन पद्धतीने नगरसेवकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली आहे. आयपीएलप्रमाणे ‘प्राइस टॅग’ लावलेले लोक आपल्याला नको आहेत, आपल्याला ‘प्राइसलेस’ लोक हवी आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

नगरसेवकांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “लोकांना बंड करण्याची किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा आहे. पण त्यांनी कोणत्या वेळेचा फायदा उचलला? तर जेव्हा मुख्यमंत्री आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या वेळेचा गैरफायदा त्यांनी स्वत:साठी घेतला.”

उद्धव ठाकरेंच्या विधानाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले की, “शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की, आम्ही कुणालाही थांबवणार नाही, ज्यांना जायचं आहे, त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने येथे, अशी लोक आपल्याला नको आहेत. ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे. ज्यांच्या मनात शिवसेना आहे. हृदयात शिवसेना आहे, अशी लोक आपल्याला पाहिजेत. कारण तेच लोक आपल्या समाजासाठी काम करू शकतात आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात, आयपीएलप्रमाणे प्राइस टॅग लावलेली लोक आपल्याला अजिबात नको आहेत. आपल्याला प्राइसलेस लोक हवी आहेत,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील नगरसेवकांशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे बंडखोर नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले. नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही
“शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा भारतात भाजपा-शिवसेनेला कुणी विचारत नव्हतं, तेव्हा हिंदु मतांची विभागणी होऊ नये, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.