आजचा दिवस मराठा आरक्षणासाठी ऐतिहासीक दिवस आहे. भाजपाने मराठा समाजाला प्रामाणिकपणे आरक्षण दिलंय, पण आम्ही दिलेलं आरक्षण विरोधकांना खुपतंय. विरोधकांनी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. मात्र, न्यायालयात हे आरक्षण टिकेल याची आम्ही काळजी घेऊ, आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करु असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलंय.

मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा होताच मुंबईमध्ये भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना तावडे म्हणाले, आघाडी सरकारने मराठ्यांना दुबळं आरक्षण दिलं होतं. पण भाजपाने प्रामाणिकपणे आरक्षण दिलंय आणि कोर्टात हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही वकिलांची फौज उभी करु. तसेच प्रसंगी सरकारकडून न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली जाईल. याशिवाय, भाजपा धनगर आरक्षणासाठीही सकारात्मक पावलं टाकतंय, सरकार धनगर आरक्षणासाठी वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले.

बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली.