लाऊड स्पिकर, भोंग्यांच्या आवाजामुळे ध्वनीप्रदुषण होत असून त्या ठिकाणच्या परिसरातील रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. बेकायदेशीर लाऊड स्पिकर आणि भोंग्यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून कारवाई करावी, अशा मागणीची लक्षवेधी भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केली होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीला उत्तर देत असताना आदित्य ठाकरेंनीही उपप्रश्न विचारला. यावेळी सत्ताधारी आमदाराकडून संजय राऊत यांचा उल्लेख करण्यात आला आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल उत्तर दिले.
सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत आदित्य ठाकरेंनीही सहभाग घेतला. बेकायदेशीर भोंग्याविरोधात उत्तम निर्णय घेतल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहिहंडी या सणादरम्यान स्थानिक पोलीस ठाण्याकडून लाऊड स्पिकरवर कारवाई केली जाते. पोलिसांनी सार्वजनिक उत्सव मंडळाला सतावू नये, असे निर्देश द्यावेत आणि पोलिसांनी जर परवानगी असूनही मंडळांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उभे राहिलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी सकाळच्या दहाच्या भोंग्याच्या विषय काढला. ते म्हणाले, “सकाळच्या दहाच्या भोंग्याबद्दल आमची तक्रार आहे. त्याबद्दलची सरकारने विचार करावा, अशी माझी मागणी आहे.” अनिल पाटील यांनी सदर प्रश्न विचारताच सत्ताधारी बाकावर एकच हशा पिकला.
अनिल पाटील यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, “या विषयातील अडचणी अशी की, ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याकडे कायदा आहे. पण विचाराच्या प्रदूषणाबद्दल आपल्याकडे अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की, आपण विचार करू.”
सणांवेळी भोंगे, लाऊड स्पिकर लावण्यास परवानगी
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सण असताना तात्पुरते भोंगे लावण्याची परवानगी देण्यात येते. त्याचा आवाज विशिष्ट डेसिबल पर्यंत ठेवण्याची अट घातली जाते. पोलीस विनाकारण कुणाला त्रास देणार नाहीत, अशाप्रकारच्या सूचना देण्यात येतील.