कोणी वाचत नाही, कोणी लिहित नाही. साहित्य संमेलनात साहित्याविषयी काहीच घडत नाही. त्यामुळे अशी साहित्य संमेलने हवीच कशाला? ही संमेलने बंदच करावीत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.
जेथे संवाद होतो, अशी संमेलने व्हायला हवीत. सरकार सोडून बाकी सर्व चांगले चालले आहे, अशी मार्मिक प्रतिक्रियाही या वेळी त्यांनी दिली. सध्याच्या साहित्य संमेलनाचा दर्जा आता आणखी खाली जाण्यास जागाच शिल्लक नाही. त्यामुळे त्याविषयी काही बोलणेही नको, असे तिखट भाष्य डॉ. नेमाडे यांनी या वेळी केले.
साहित्याशी संबंध नसलेल्यांची गर्दी झालेल्या संमेलनांकडे साहित्यिकांनीच पाठ फिरवायला हवी, अशी टिप्पणी त्यांनी केली. नवोदित साहित्याविषयी ते म्हणाले की, अलीकडे चांगले लिहिले जात आहे. शेतकरी व गावाकडची माणसे लिहित आहेत, हे बरे आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी साहित्य कुठे आहे, या प्रश्नावर बोलताना मल्याळी, कन्नड साहित्य मराठीपेक्षा दर्जेदार आहे. बंगाली व मराठीचा क्रम नंतरचा लागतो. ग्रामीण भागात पुस्तके पोहोचविण्यासाठी अन्य राज्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रयोग सुरू आहेत, तसे आपल्याकडे होत नाहीत. वडार समाजातील अशोक पवार नावाचा लेखक दर्जेदार लिहितो आहे. पण तो पोहोचतो कुठे? प्रत्येक जिल्ह्य़ात पुस्तकांसाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत.
जागतिकीकरणाचे पडसाद मराठी साहित्यात उमटलेच नाहीत, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. तत्पूर्वी साहित्य अकादमीतर्फे आयोजित पूवरेत्तर व पश्चिम भागातील लेखकांच्या संमेलनात उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ. नेमाडे यांनी हिंदू मूलतत्त्ववादाचे मूळ महाराष्ट्रातच असल्याचे म्हटले होते. याचा खुलासा पत्रकारांशी बोलताना त्यांनी विस्ताराने केला. सावरकर-हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनी संप्रदाय या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात होता. या मंडळींनी समाजात द्वेष पसरविला. मराठी संस्कृतीला याचा मोठा धोका आहे.
संमेलनातील आजचे कार्यक्रम
सकाळी ९ ते ११-३०
बाल जल्लोष, सभामंडप -१
सकाळी ९-३० ते ११-३० परिसंवाद, विदेशातील मराठीचा जागर. सभामंडप-२ अध्यक्ष- जयंत बापट
दुपारी १२ ते १-३०
परिसंवाद- मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी. सभामंडप-१ अध्यक्ष- नितीन चंद्रकांत देसाई
दुपारी २-३० ते ४-००
कथाकथन, सभामंडप- १
दुपारी २-३० ते ४-००
परिसंवाद. कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था, सभामंडप-२, अध्यक्ष- सुधीर रसाळ.
दुपारी ४ ते ७ समारोप समारंभ- सभामंडप- १. मुख्य अतिथी- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, विशेष उपस्थिती-ना.धों.महानोर.
रात्री ७-३० ते १०-००
मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्ती सोहोळ्यानिमित्त सांगीतिक कार्यक्रम- शंभर नंबरी सोने. सादरकर्ते- नितीन चंद्रकांत देसाई. सभामंडप-१.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
दर्जाहीन साहित्य संमेलने हवीतच कशाला – नेमाडे
कोणी वाचत नाही, कोणी लिहित नाही. साहित्य संमेलनात साहित्याविषयी काहीच घडत नाही. त्यामुळे अशी साहित्य संमेलने हवीच कशाला? ही संमेलने बंदच करावीत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.
First published on: 13-01-2013 at 03:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is a need of unstandard literature gadring nemade