scorecardresearch

लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात काय होणार?

महाराष्ट्रात लॉक डाऊन सदृश्य स्थिती

चीनमधील वुहान शहरात करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर चीनमध्ये हातपाय पसरवणाऱ्या करोना विषाणूंनी चीनच्या सीमा पार करत जगभरात थैमान घातलं. इतके दिवस आजूबाजूच्या देशातून आणि राज्यातून बातम्या येत असताना अचानक पुण्यात दोन करोनाबाधित रुग्ण सापडले आणि महाराष्ट्रातही करोनानं शिरकाव केल्याचं निष्पन्न झालं. तेव्हापासून राज्यात जे घडतं आहे, त्यावर प्रत्येक जण नजर ठेवत आहे. सध्या महाराष्ट्रात करोना दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झालं असून, लॉक डाऊनच्या दिशेनं पावलं पडत असल्याचं एकून उपाययोजनांवरून दिसत आहे.

करोना संसर्गजन्य आजार असल्यानं झपाट्यानं फैलावत आहे. या आजारात मृत्यूचा दर अत्यंत कमी असला तरी, पसरण्याचा दर खूप जास्त आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे सरकारनं त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. विशेष म्हणजे स्पेन, इटली या देशांनी ‘लॉक डाऊन’चा पर्याय निवडला. त्यामुळे ‘लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न आता अनेकांना पडतो आहे.

‘लॉक डाऊन’ झालं तर परिस्थिती कशी असणार?

दुर्मिळ वेळा ‘लॉक डाऊन’सारखा पर्याय स्वीकारला जातो. ‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. संभाव्य धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा निर्णय किती कालावधीसाठी ठेवायचा हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे. सध्या अशी तरी असा निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर हा लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो.

इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. वुहानमध्येही ‘कोरोना’चा उगम झाल्यानंतर परिस्थिती चिंताजनक झाल्यानं ‘लॉक डाऊन’ करण्यात आलं होतं.

महाराष्ट्रात लॉक डाऊन सदृश्य स्थिती

राज्य सरकारनं रुग्णांची संख्या वाढताच गर्दी कमी करण्याचा उपाय हाती घेतला. यासंदर्भात तातडीनं आदेशही जारी करण्यात आले. सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, जिम, जलतरण तलाव बंद केले असून, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गर्दी कमी व्हावी यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. या उपाययोजना अपुऱ्या ठरल्या, तर पुढील काही काळात सार्वजनिक वाहतूकही बंद केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is lockdown how will situation in maharashtra bmh