Devendra Fadnavis And Sharad Pawar Phone Call Details: गेल्या महिन्यात जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाष्य केले आहे. तसेच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनवर काय चर्चा झाली हे सुद्धा सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले की, “मी, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील इतर महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येत, दोन-तीन नावांवर चर्चा केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत झाले. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने, महाराष्ट्रातील मतदारांनी राज्यपालांना मतदान करावे, अशी विनंती त्यांनी मला केली. मी त्यांना सांगितले शक्य नाही. नंतर मला कुणीतरी विचारले की, हे का शक्य नाही. कारण, ते आमच्या विचारांचे नाहीत.”
फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनबाबत माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोललो. मी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल, जे स्वतः महराष्ट्राचे मतदार आहेत, त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की ते निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील, तर शरद पवार म्हणाले की विरोधी पक्षाचा स्वतःचा उमेदवार असल्याने ते त्यांच्यासोबत राहणार आहेत.”
कोण आहेत सुदर्शन रेड्डी?
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. ७८ वर्षीय सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सुदर्शन रेड्डी यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर १९८८ ते १९९० या दरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले. १९९५ मध्ये सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर डिसेंबर २००५ मध्ये सुदर्शन रेड्डी यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. पुढे १२ जानेवारी २००७ रोजी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. ८ जुलै २०११ रोजी निवृत्त होईपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.