Sharad Pawar On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर केलेल्या आरोपांबाबतही शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे, भाजपाकडून नाही, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एक मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही जास्त बोलत नाहीत. मात्र, त्यांची पुढची भूमिका काय असेल? हे लवकरच कळेल असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांत दिल्लीचे दोन दौरे केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा परत येण्याच्या बाबतीत काही संकेत देत आहेत का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना विचारला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “असे कोणते संकेत वैगेरे काही नाही. आम्ही अशा कोणत्या चर्चा केल्या नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा स्वभाव आहे की ते कधीही जास्त बोलत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांचा पुढचा मार्ग कसा असेल? याचा अंदाज लवकरच येईल”, असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे दिल्लीत पाठिमागच्या रांगेत का बसले होते?

“दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी देखील उपस्थित होतो. पहिल्यांदा हे सांगायचं आहे की मी कालपासून पाहत आहे की, दिल्लीत उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले होते? यावरून राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेजेंटेशन केलं, आता प्रेजेंटेशन पाहायचं म्हटलं की आपण पहिल्या रांगेत कधी बसत नाही. जसं आपण एखादा चित्रपट पाहायला गेलं तर पहिल्या रांगेत बसत नाहीत, आपण पाठिमागे बसतो. त्याच पद्धतीने मी स्वत: देखील शेवटी बसलो होतो. सांगण्याचं तापत्पर्य एवढंच आहे की स्क्रिनच्या जवळ आपण बसत नाहीत, अंतर सोडून बसतो. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले? याचं दुर्देवाने राजकारण करण्यात येत आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नाही’ : शरद पवार

“राहुल गांधी यांनी अतिशय कष्ट करून मतदान प्रक्रियेतील अनियमिततेबाबतची माहिती सांगितली. एका ठिकाणी एक व्यक्ती राहते. पण त्याच ठिकाणाहून ४० लोकांनी मतदान केलं आहे. अशा प्रकारचे उदाहरणे राहुल गांधींनी दिले. राहुल गांधींनी फक्त उदाहरणे दिली नाहीत तर त्या आरोपांना आधार देखील दाखवला. मात्र, राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने एक शपथपत्र द्यावं असं म्हटलं. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. राहुल गांधींनी सांगितलं की मी संसदेत शपथ घेतलेली आहे, त्यामुळे वेगळ्या शपथपत्राची गरज नाही. मात्र, तरीही निवडणूक आयोग अशा प्रकारचा आग्रह करत असेल तर हे योग्य नाही. मात्र, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांबाबत खोलवर जाण्याची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की आक्षेप निवडणूक आयोगाबाबत घेतला, मग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देण्यासाठी पुढे येण्याची गरज काय? आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.