महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय हा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ ला बंड केलं. त्यांना साथ मिळाली ती शिवसेनेतल्या ४० आमदारांची. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला. हा सामना कोर्टातही गेला. सर्वोच्च न्यायलयात ९ महिने सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला. आता निकाल काय लागणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे चंद्रशेखर बावनुकळेंनी?

आम्ही २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. भाजपा आणि शिवसेना युती मिळून आम्ही या निवडणुका लढवू. आम्ही २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू असाही विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्यांना विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे तेच लोक भाजपात येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागतच करु. तसंच निकाल काहीही आला तरीही सरकार स्थिर असेल असाही दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागणार असल्याचे संकेत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे सातत्याने निकाल आमच्या बाजूने लागेल असं म्हणत आहेत. तर भाजपा आणि शिंदे गटाचे नेते योग्य निकाल लागेल असं म्हटलं आहे. तर आजच अजित पवार यांनी १४५ आमदार असेपर्यंत सरकारला धोका नाही असं म्हटलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय घडणार त्याची उत्सुकता ताणली गेली आहे.