डॉ. प्रवीण तोगडिया यांचा सवाल

मुस्लिमांच्या आक्रमणामुळे देश हा बरबादीकडे जात आहे. यासाठी तमाम हिंदूनी एकत्र येऊन या देशाचे संविधान बदलून आणि कायदा बदलून हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची गरज आहे. आणि त्यांच्याहून पुढे जाऊन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प जर मुस्लिमांना रोखण्याचा निर्णय घेत असेल तर बहुसंख्य हिंदू असलेला भारत देश बांग्लादेशी मुसलमानांबाबत शांत का? असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांनी उपस्थित करीत अप्रत्यक्षरीत्या नरेंद्र मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

येथील मृदुंगाचार्य शंकरआप्पा मंगळवेढेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त समारोपाच्या कार्यक्रमास डॉ. प्रवीण तोगडिया पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी ते जाहीर भाषणातून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भागवताचार्य वा. ना. उत्पात. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, विश्व हिंदू परिषदेचे दीपक महाराज सरनाईक, प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे, रवींद्र साले, मोहन मंगळवेढेकर आदी यावेळी उपस्थित होते.

तोगडिया म्हणाले, सध्या हिंदू राष्ट्र करण्यासाठी कायद्यात बदल करून लाहोर आणि रावळिपडीपर्यंत भगवे झेंडे नेण्याची गरज आहे. यासाठी संकल्प करणे आवश्यक आहे. मात्र हा संकल्प हिंदू राष्ट्र असणाऱ्या भारतात होण्याऐवजी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प करताना दिसत आहे.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. या देशाला जर आतंक माजविणाऱ्या मुस्लिमांची भीती वाटत असेल आणि त्यासाठी जर ट्रम्प एक लाख मुस्लिमांना अडवत आहे तर तीन कोटी बांगलादेशी मुसलमान काय भारताचे जावई आहेत का? यांच्याबाबत असा निर्णय का होत नाही. असा सवालही त्यंनी उपस्थित करीत आपण कुठल्या पक्षाला नाही तर व्यवस्थेला दोष देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मक्का मशिद ही पूर्वी हिदूंचे मंदिर होते. मात्र तेथे आता मशिद आहे. या भागांचे संपूर्णपणे मुस्लिमीकरण झाले आहे आणि भविष्यात अशी गत भारताची करून घ्यावयाची नसेल तर यासाठी मोठय़ा प्रमाणावर हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कारण हिंदू राष्ट्र झाले तर आम्ही आमच्या प्रथा परंपरांचे पालन करू शकू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

याप्रसंगी त्यांनी मोठय़ा प्रमाणावर आपल्या भाषणात हिंदू धर्माचे कौतुक करीत असताना मुस्लिमांच्या वागणुकीवर टीका करीत चक्क या देशाचा कायदाच बदलून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आता संकल्प करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी मृदुंगाचार्य हिंदुत्त्वनिष्ठ शंकरआप्पा मंगळवेढेकर यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, शंकरआप्पा यांनी मृदुंग लाहोरमध्ये नेला. मात्र आम्ही भगवा ध्वज तेथे नेऊ शकलो नसल्याची खंतही त्यांनी भाषणांच्या सुरुवातीला व्यक्त केली होती.

या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत मोहनराव मंगळवेढेकर यांनी केले तर प्रास्ताविक भाषणात वा .ना. उत्पात यांनी शंकरआप्पा मंगळवेढेकर यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. यावेळी अध्यक्षीय समारोप हा सुधाकरपंत परिचारक यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शांताराम कुलकर्णी आणि डॉ. वर्षां काणे यांनी केले आहे. कार्यक्रमाचा समारोप हेमंत उत्पात यांच्या वंदे मातरम् गायनाने झाला.

उध्दव आणि फडणवीस समजदार

राज्यात दोन हिंदुत्त्वनिष्ठ असणाऱ्या शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. अशा स्थितीस आपण कसे पाहता, अशी विचारणा यावेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे केली. यावर डॉ. तोगडिया म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे दोघेही समजदार आहेत.

ते नक्कीच एकत्र येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच याप्रसंगी राममंदिराबाबतही पत्रकारांनी त्यांना छेडले, त्यावर आता आपण राममंदिराबाबत बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.