चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने राज्यातील राजकारणातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्यासोबतची एक आठवणही आज शेअर केली. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

“२०१९ मध्ये एवढी जबरदस्त भाजपाची लाट असताना, काँग्रेसची एकही जागा नसताना त्यांच्या प्रयत्नांमळे त्यांची जागा निवडून आली. उपमुख्यमंत्री होतो तेव्हा ते स्वत: आणि त्यांच्या पत्नी अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची कामे घेऊन यायचे. पाठपुरावा करणारे कणखर नेतृत्त्व होतं ते. सर्वसामान्य जनतेशी अतिशय घट्टपणे नाळ जुळलेला नेता, अशी त्यांची ओळख होती. परंतु एका आजाराने ग्रासलं, दिल्लीसारख्या ठिकणी नेऊन सुद्धा काळाच्या नियतीसमोर कोणाचं चाललं नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा त्या भागात अतिवृष्टी झाली होती. तेव्हा त्यांच्या भागाचा पाहणी दौरा केला होता. अतिशय मनमिळावू त्यांचा स्वभाव होता. आमचं चंद्रपूरला कार्यालय नव्हतं. मी माझं कार्यालय देतो असं ते म्हणाले. मी म्हटलं असं कसं शक्य आहे. तर म्हणाले मी पवार साहेबांना मानतो. मला राष्ट्रवादीही आपलीशी वाटते. आपण सर्वांनी मिळूनच काम करावं. एका मित्र पक्षाचं कार्यालय बांधण्याकरता जागा देण्याचा दिलदारपणा त्यांच्याकडे होता,” असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने प्रतिभाताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपली भूमिका शेवटपर्यंत यश मिळेपर्यंत प्रयत्न असायचा. काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली पण मविआचा खंदा समर्थक सोडून गेला याचीही खंत आहे”, असंही अजित पवार म्हणाले.