“महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?” असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, “देशातील जनतेची सकाळ सध्या महागाईच्या बातमीने होते. दररोज वाढणा-या इंधनाच्या किंमतीने आणि महागाईने सर्वसमान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दहा दिवस दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ करुन आज व्यावसायीक गॅस सिंलिंडर २५० रुपयांनी महाग केला. या महागाईचे सर्वच स्तरातील लोकांना चटके बसत आहेत. वाढत्या महागाईने चहा सुद्धा महाग झाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. या महत्वाच्या विषयावर लक्ष देण्यास पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली परिक्षा पे चर्चा करत आहे. अशीच चर्चा त्यांनी देशातील महागाईसह इतर ज्वलंत प्रश्नावरही करायला पाहिजे.”
स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, ती बोगस आहे … –
तसेच “ज्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल ठोस माहिती नाही, स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, ती बोगस आहे असा आरोप केला जात आहे. तेच विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थी व पालक दोघांनाही भवितव्याच्या चिंतेने ग्रासले असून पंतप्रधान मोदी मात्र त्यांना कोरडे सल्ले देण्याचे काम करत आहेत. गटारातल्या गॅसवर चहा करण्याचा किस्सा सांगणाऱ्या मोदींकडून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा?” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या आपल्या कार्यक्रमाच्या ५व्या भागामध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. पण करोनामुळे मी तुमच्या सारख्या माझ्या सहकाऱ्यांना भेटू शकलो नाही. आज होणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, कारण मोठ्या अंतरानंतर आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, सणांच्या दरम्यानच परीक्षा असतात. त्यामुळे सणांची मजा घेता येत नाही. पण जर परीक्षांनाच आपण सण बनवलं तर त्यात अनेक रंग भरले जातात.